कुंडलमध्ये जी. डी. बापूंच्या स्मारकाची उभारणी गतीने
By admin | Published: November 9, 2015 10:10 PM2015-11-09T22:10:21+5:302015-11-09T23:29:17+5:30
अरुण लाड यांची माहिती : ४० लाखांचा निधी उपलब्ध
कुंडल : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतींची पुढील पिढीस माहिती होण्यासाठी, संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी कुंडल (ता. पलूस) येथे राज्य शासनाच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकास शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, या कामासाठी ४० लाख रुपये उपलब्ध झाल्याने स्मारक उभारणीचे कामकाज गतीने चालू आहे, अशी माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
समाजामध्ये टोकाची असहिष्णुता वाढत असताना, विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असताना, स्वातंत्र्य संग्रामातील, देशसेवेचे, एकतेचे, सहिष्णुतेचे, सार्वभौमत्वाची स्फूर्ती हे गुण युवावर्गाने आत्मसात करावेत, याकरिता या स्मारकामध्ये ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पारतंत्र्याचा काळ व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली प्राणाची बाजी चित्ररूपाने आजच्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या सर्व बाबींचा पाठपुरावा क्रांती कारखान्याच्या माध्यमातून होत आहे. प्रत्यक्ष बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिसाळ व कंत्राटदार व्ही. डी. वाजे आले असता, या स्मारकासाठी राज्य सरकारने ४ कोटी ९५ लाख ८७ हजार रुपयांच्या योजनेस मंजुरी दिली असून, दोन कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.
यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, शरद लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष भीमराव महिंद, पोपटराव संकपाळ, दिलीपराव पाटील, कुंडलिक थोरात, पोपटराव फडतरे, महावीर चौगुले, लालासाहेब महाडिक, श्रीरंग पाटील, आत्माराम हारुगडे, लक्ष्मण हेंद्रे, कुंडलिक एडके, वसंत लाड, जगन्नाथ आवटे, सी. एस. गव्हाणे, एस. आर. गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)