यकृत दान करून आईला दिला मुलीने पुनर्जन्म
By Admin | Published: April 25, 2016 11:32 PM2016-04-25T23:32:32+5:302016-04-26T00:28:54+5:30
आष्ट्यातील घटना : सानिया आत्तार हिच्या धाडसाला सर्व घटकांतून सलाम...
आष्टा : येथील माजी नगराध्यक्षा सौ. झिनत रियाज आत्तार यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलगी सानिया (वय २०) हिनेच यकृत दान करीत आईला जीवदान दिले. सानियाच्या धाडसाचे कौतुक होत असून, सौ. आत्तार यांच्यासाठी शहरातील सर्वधर्मियांनी प्रार्थना केली.
झिनत आत्तार २०११ मध्ये आष्ट्याच्या नगरसेविका म्हणून उच्चांकी मतांनी विजयी झाल्या. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने त्यांना नगराध्यक्षपद दिले. येथील पहिल्या मुस्लिम नगराध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला. विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या आत्तार यांनी शहराच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न केला.
काही महिन्यांपासून त्यांना काविळीने ग्रासले होते. मात्र निदानच लवकर न लागल्याने आजार बळावत गेला. सांगली, मिरजेतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार कण्यात आले. मात्र सुधारणा न झाल्याने आत्तार यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आत्तार यांचे यकृत ८० ते ८५ टक्के निकामी झाल्याने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे बनले होते. यासाठी रक्तातील नात्यातील कोणाचे तरी यकृत काढून रोपण करण्याचे ठरले. मात्र कोणाचे यकृत द्यायचे, यावर एकवाक्यता होत नव्हती.
माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, शैलेश सावंत, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, शकिल मुजावर यांनी तातडीने पैशाची व्यवस्था करून २५ लाख रुपये भरले. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील, विलासराव शिंदे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा करून तातडीने योग्य उपचार करण्यास सांगितले. रक्ताच्या ४० बाटल्यांची गरज होती. मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रक्त उपलब्ध करून दिले.
झिनत आत्तार यांना कोणाचे यकृत द्यायचे, याबाबत विचार सुरू असताना, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी त्यांची मुलगी सानियाने मागचा-पुढचा विचार न करता, आपलेच यकृृत देण्यासाठी हट्ट धरला. आष्ट्याहून तातडीने ती मुंबईला गेली. वडील राजू आत्तार यांना निर्णय घेणे अवघड झाले. मात्र सानियाच्या हट्टापुढे सर्वांनी होकार दर्शविला. सानियाच आईचा श्वास बनली व शस्त्रक्रियेला सामोरी गेली. सुमारे १६ तासांची शस्त्रक्रिया १२ ते १३ तासात संपली.
आईने मुलीला जन्म देऊन हे जग दाखविले, तर मुलीने मरणाच्या दाढेत असलेल्या आईला जीवनदान देऊन, सर्वच नात्यांपेक्षा माय-लेकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. (वार्ताहर)
एकात्मतेचे दर्शन
आष्टा येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी मंदिर व मशिदीमध्ये आत्तार यांच्यासाठी प्रार्थना केली. सर्वांच्याच प्रार्थनेला व मदतीला यश मिळाले. झिनत आत्तार व सानिया आत्तार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.