सांगली, कोल्हापूरच्या रक्तदात्यांकडून कर्नाटकच्या तरुणास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:24 PM2019-05-13T23:24:04+5:302019-05-13T23:24:09+5:30
सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता ...
सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता वाढली. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर अखेर त्यांना सांगलीच्या बॉम्बे ग्रुपच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. कोल्हापूर व सांगली याठिकाणच्या बॉम्बे ग्रुपच्या दोन रक्तदात्यांनी धावाधाव करून या तरुणाला जीवदान दिले. माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांची मनेही या तरुणांनी जिंकली.
रायबाग येथील जनार्दन गोपाळ वंजिरे या ३३ वर्षीय तरुणाचा जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रक्ताच्या विविध तपासण्या केल्यानंतर, त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ म्हणजेच ‘बॉम्बे ओ’ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांना हा रक्तगट किती दुर्मिळ आहे, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्याचे प्राण वाचविण्यासाठी दोन बाटल्या रक्त तातडीने हवे होते. बेळगावसह कर्नाटकातील अनेक रक्तपेढ्यांशी संपर्क केल्यानंतरही, त्यांना हे रक्त उपलब्ध झाले नाही. शेवटी इंटरनेटवरून त्यांना सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावेळी ग्रुपचे संस्थापक विक्रम यादव यांनी हे रक्त उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील हणमंत भोसले आणि कोल्हापूर येथील सुनील भोसले या दोघांशी त्यांनी संपर्क साधला. सुनील भोसले हे बेळगावला जाऊन रक्तदान करायला तयार झाले, मात्र हणमंत भोसले यांना कामावरून सुटी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे त्यांनी कामाच्या ठिकाणी, आईच्या प्रकृतीचे कारण सांगून केवळ तीन तासांची सुटी काढली. त्यानंतर त्यांनी मिरजेतील एका रक्तपेढीत रक्तदान केले. ग्रुपच्या सदस्यांनी हे रक्त रेल्वेने बेळगावच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. अत्यंत कमी वेळात हे रक्त पोहोचल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचविणे डॉक्टरांना शक्य झाले.
नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू
दोघांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. नातेवाईकांच्या डोळ्यात त्यांच्या मदतीने अश्रू उभे राहिले. वंजिरे यांचा धोका आता टळला असल्याचे सांगत, येथील डॉ. रवी पाटील, ब्लड बँकेचे संचालक गिरीश बुडरकट्टी यांनी भोसले यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
काय आहे ‘बॉम्बे ब्लड’
मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव या रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते.