सांगली जिल्ह्यात लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, दिवसात २४ जनावरांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:08 PM2022-12-06T13:08:17+5:302022-12-06T13:08:53+5:30
सुरुवातीला दहा ते पंधरा असणारी बाधितांची संख्या आज शेकडोंच्या घरात गेली आहे.
सांगली : जिल्ह्यात लम्पीचा फैलाव थांबता थांबत नसल्यामुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दिवसात २४ जनावरांचा लम्पी आजाराने बळी गेला आहे. तसेच नवीन १४९ जनावरांना लम्पीची लागण झाल्यामुळे बाधित जनावरांची जिल्ह्यात ११ हजार २७ संख्या झाली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ११ हजार २७ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाली आहे. यातील चार हजार ७७३ पशुधन बरे झाले आहे. तसेच पाच हजार ३६५ जनावरांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तसेच या आजाराच्या प्रादुर्भावाने एकूण ८८९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस संसर्गाचा आलेख वाढत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दहा ते पंधरा असणारी बाधितांची संख्या आज शेकडोंच्या घरात गेली आहे. प्रामुख्याने मिरज, वाळवा, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यात प्रादुर्भाव गतीने वाढत आहे.
तालुकानिहाय एकूण बाधित पशुधन
तालुका - बाधित - मृत
मिरज - २८२४ - २००
आटपाडी - १६६४ - ११८
पलूस - ५८२ - ६६
तासगाव - ५८५ - ५७
खानापूर - ९७५ - ८७
कडेगाव - ३९० - २५
वाळवा - १८५१ - १३८
क.महांकाळ - ७५९ - ८६
जत - १११४ - ९३
शिराळा - २६४ - १९