अनुदान मंजुरीसाठी मागितले ८ हजार : लाच घेताना पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 09:06 PM2020-01-28T21:06:35+5:302020-01-28T21:08:00+5:30
त्यानुसार मंगळवारी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुधन विकास अधिकारी सवासे याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडले. याप्रकरणी सवासे याच्याविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज : मिरजेत पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण सुभाष सवासे (वय ४२, रा. मालगाव रोड, मिरज) यास शेळी गट योजनेच्या अनुदान मंजुरीसाठी ८ हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर सांगलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पंचायत समितीत खळबळ उडाली आहे.
सलगरे (ता. मिरज) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण सवासे याच्याकडे मिरज पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सलगरे येथील तक्रारदाराने जुलै २०१९ मध्ये शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत शेळी गट योजनेसाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केला होता. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर १० शेळ्या व १ बोकड खरेदीसाठी सुमारे ५० हजार रूपये अनुदानाची रक्कम मंजूर करण्यासाठी डॉ. सवासे याने तक्रारदाराकडे १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणीत सवासे याने तक्रारदाराकडे १० हजारांची मागणी केल्याचे, तसेच ८ हजार रूपयात सौदा ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुधन विकास अधिकारी सवासे याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडले. याप्रकरणी सवासे याच्याविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरूदत्त मोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, संजय संकपाळ, राधिका माने, अश्विनी कुकडे, सारिका साळुंखे-पाटील, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.