राज्यात पशुधन घटतेय, पशुगणना अहवाल प्रसिद्ध

By अशोक डोंबाळे | Published: December 7, 2023 12:22 PM2023-12-07T12:22:36+5:302023-12-07T12:22:55+5:30

गायी-बैलांसह घोडा, गाढव, वराहांच्या संख्येत घट

Livestock is decreasing in the state, Livestock Census Report released | राज्यात पशुधन घटतेय, पशुगणना अहवाल प्रसिद्ध

राज्यात पशुधन घटतेय, पशुगणना अहवाल प्रसिद्ध

अशोक डोंबाळे

सांगली : राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशूंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९.५४ टक्के घटली आहे. तसेच घोडा, गाढव, वराहांच्या संख्येत ३८ ते ४८ टक्क्यांपर्यंत घट आहे. या संबंधीचा अहवाल राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केला आहे.

शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २०१९ मध्ये सुरू केलेली पशुगणना पूर्ण झाली असून, नोव्हेंबर २०२३ मध्ये अंतिम अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०१२ मध्ये राज्यात गायी-बैलांची ग्रामीणमध्ये १ कोटी ५० लाख ८९ हजार ६५५ संख्या होती. २०१९ च्या पशुगणनेत ९.५४ टक्के घट होऊन १ कोटी ३६ लाख ४९ हजार १९५ झाली आहे. शहरात सर्वाधिक १३.०३ टक्क्यांनी घट आहे. ग्रामीणमध्ये ०.७३ टक्क्यांनी म्हशींची संख्या वाढली आहे. शहरामध्ये ७.६० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण भागात मेंढ्यांची संख्या ४.०२ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ४.३१ टक्क्यांनी घट आहे.

शेळ्यांची संख्या ग्रामीणमध्ये २७.७३ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ८.९० टक्क्यांनी घटली आहे. घोड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.२६ टक्क्यांनी, तर शहरात ५४.३९ टक्क्यांनी घटली आहे. खेचरची ग्रामीणमध्ये ८७.०२ टक्के घट, तर शहरात २३८८.२४ टक्के वाढ झाली आहे. गाढवांची संख्या ग्रामीणमध्ये ३८.२३ टक्के, तर शहरात ४३.८६ टक्के घट झाली आहे. वराहांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.८३ टक्के, तर शहरात ५४.९३ टक्के घट आहे. श्वानांची संख्या ग्रामीणमध्ये ३४.४५ टक्क्यांनी घटली असून, शहरात २१.९९ टक्के वाढ झाली आहे. कोंबड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ३.८५ टक्के घट, तर शहरात २७.६५ टक्के घट आहे.

महाराष्ट्रात उंटांची संख्या वाढली

वाळवंटाचा राजा म्हणून ओळख असलेल्या उंटांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राची मान उंच राहिली आहे. महाराष्ट्रात २०१२ च्या पशुगणनेत ग्रामीण भागात ११६ उंट होते. यामध्ये दुप्पट वाढ होऊन २०१९ च्या पशुगणनेत ३०० संख्या झाली आहे. २५८.६२ टक्क्यांनी उंटांची संख्या वाढली आहे. तीच परिस्थिती शहरी भागातही आहे. शहरात पूर्वी ६६ उंट असून, त्यात वाढ होऊन १६५ झाले आहेत. शहरातही १५० टक्क्यांनी उंट वाढले आहेत.

पाळीव प्राण्यांची ग्रामीणची संख्या

                २०१२   -   २०१९ टक्के   - वाढ/घट
गाय-बैल - १५०८९६५५ - १३६४९१९५ - ९.५४ घट
म्हैस   - ५२०९९९४ -  ५२४८५२८  - ०.७३ वाढ
मेंढी - २५३३९६१  - २६३५९१३ -  ४.०२ वाढ
शेळ्या - ७९७१८४२ - १०१८२६८६ - २७.७३ वाढ
घोडा - ३०७८१ - १५९२५ - ४८.२६ घट
खेचर - १९८८ - २५८  - ८७.०२ घट
गाढव - २१६०५ - १३३४५ - ३८.२३ घट
उंट - ११६  - ३०० - १५८.६२ वाढ
वराह - २३२६८३ - ११९०६० - ४८.८३ घट
श्वान - १०७७८५६ - ७०६४९२ - ३४.४५ घट
कोंबड्या - ७५६९६१२० - ७२७७९५४० - ३.८५ घट

Web Title: Livestock is decreasing in the state, Livestock Census Report released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली