जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:45 PM2019-01-19T19:45:53+5:302019-01-19T19:47:51+5:30
संथ वाहते कृष्णामाई, तिरावरल्या सुख-दु:खाची जाणीव तिजला नाही, अशी संथ वाहणाऱ्या सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे.
संजयनगर : संथ वाहते कृष्णामाई, तिरावरल्या सुख-दु:खाची जाणीव तिजला नाही, अशी संथ वाहणाऱ्या सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. या ठिकाणी पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवणार आहेत.
नदीकाठच्या अनेक गावांचे व शहरातील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. नदीच्या पाण्याचा वासही उग्र येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शुक्रवारी नदी पात्रातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
कृष्णा नदीचा उगम वाई तालुक्यात झाला आहे. वाईपासून सांगलीपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात अनेक गावांचे सांडपाणी मिसळत आहे. तसेच काही उद्योगातील दूषित पाणी थेट नदीपात्रात येऊन मोठ्याप्रमाणात मिसळत आहे.
सध्या देशात नदी स्वच्छता अभियान सुरू आहे. गावे, शहरे हागणदारीमुक्त होऊ लागली आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. पण शौचालयांतील दूषित पाण्याची व्यवस्था कुठेही नसल्याने हे पाणीसुध्दा गटारीतून नदीतच मोठ्याप्रमाणात मिसळत आहे. कृ ष्णा नदीत मोठ्याप्रमाणात जलपर्णी, केंदाळ, गवत उगविले आहे. पाण्याला हिरवा रंग आला आहे.जनावरे धुणे, धार्मिक कार्यक्रमानंतर नदीत वस्तू विसर्जन करणे, विविध प्रकारचा कचरा याची प्रदूषणात भर पडत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याचे शुध्दीकरण करणे गरजेचे आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासन गांभीर्याने पाहात नाही.
जनजागृतीची गरज
वाढत्या प्रदूषणामुळे सांगलीतील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. पाणी प्रदूषणाची कारणे आणि ते रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जावी.
प्रदूषण महामंडळ करते काय?
सांगली जिल्'ातील कार्यरत असणारे प्रदूषण नियंत्रण महामंडळ कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत उदासीनतेची भूमिका बजावत आहे. असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. प्रदूषण विभागाने याकडे लक्ष द्यावे.