पक्ष बाजूला ठेवत स्थानिक आघाड्या
By admin | Published: January 13, 2017 11:13 PM2017-01-13T23:13:59+5:302017-01-13T23:13:59+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : भाजपमध्येही बंडाळी; काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचे आघाड्यांबाबत मौन
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पक्षाची भूमिका बाजूला ठेवून प्रत्येक तालुक्यात स्थानिक आघाड्यांची तयारी केली आहे. मात्र त्याबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मौन पाळले आहे. स्थानिक आघाड्या आणि नेत्यांची भूमिका लक्षात घेतल्यास, जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमीच जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास राष्ट्रवादीने सुरूंग लावून सलग तीनवेळा सत्ता ताब्यात ठेवली. जिल्हा परिषदेतील ६२ सदस्यांपैकी राष्ट्रवादीकडे ३२ सदस्यांचे संख्याबळ आहे. शिवाय दोन अपक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाची साथ मिळाल्यामुळे, त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल सुरळीत गेला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेवर कमळ फुलविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरात फिल्डिंग लावली आहे. परंतु, वरिष्ठ नेत्यांना भाजपमधील अंतर्गत कलह थोपविण्यात सध्या तरी यश आले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपमधील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी स्वतंत्र आघाडी करून कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आटपाडीत खासदार संजयकाका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचे पटत नसल्याचे दिसत आहे. येथेही दोन्ही नेते काही स्थानिक आघाड्यांशी समझोता करून निवडणुका लढविण्याच्या तयारीत आहेत.
जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसच्या नाराज गटातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जनुसराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची तयारी केली आहे. येथे राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी आघाडीही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आटपाडीचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सर्वच पक्ष आणि संघटनांपुढे समझोत्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यादृष्टीने त्यांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांबरोबर एक बैठकही झाली आहे. राजेंद्रअण्णांच्या आवाहनाला विरोधी गटाच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आघाडीबाबत बोलणी सुरू आहेत. शिराळा तालुक्यात काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आघाडी करून प्रचार प्रारंभही केला आहे. तेथे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रपक्षांसह आघाडी करण्याच्या विचारात आहे.
वाळवा तालुक्यात इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यासाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना नेते सरसावल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आघाडी करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सहमतीही दिली आहे.
कडेगाव आणि पलूस तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. छुपा समझोता करून जागावाटप करण्याचा त्यांचा विचार आहे. उमेदवार मात्र संबंधित पक्षाच्या चिन्हावरच लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम हे काँग्रेसचा बालेकिला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
खानापूर तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे निश्चित आहे. काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड्. बाबासाहेब मुळीक यांनी एकत्रित दौरेही सुरू केले आहेत. उमेदवार निवडून आणण्याच्यादृष्टीने येथे जागावाटप होणार असल्याचे मुळीक सांगत आहेत. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांना बरोबर घेऊन पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मिरज तालुक्यात अजितराव घोरपडे गट कोणाशी समझोता करणार, यावरच मिरज पूर्व भागातील लढती अवलंबून आहेत. मिरज पश्चिम भागातील समडोळी, कवठेपिरान, कसबे डिग्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, भाजप अशी आघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य भीमराव माने यांच्या भूमिकेलाही तेवढेच महत्त्व आहे. मिरज तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची कसोटी लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांची उणीवही पक्षाला जाणवणार आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, भोसे गटात भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. तेथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. मिरज तालुक्यात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आणि खासदार संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राष्ट्रवादीबरोबर आघाडी नाही : मोहनराव कदम
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आजपर्यंत कधीच काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही काँग्रेसची राष्ट्रवादीबरोबर आघाडी होणार नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रस्ताव दिला तरीही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच आघाडी नको आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात स्थानिक आघाडीसाठी सहमती दिली आहे. उर्वरित ठिकाणी काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीला आबांची उणीव भासणार
आर. आर. (आबा) पाटील यांचे ग्रामीण भागाशी घट्ट नाते होते. याचा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला फायदा होत होता. यावर्षी पहिलीच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक त्यांच्याशिवाय होत आहे. याची उणीव नक्की राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणवणार आहे.