प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:46 AM2022-02-02T11:46:48+5:302022-02-02T11:48:38+5:30
नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार
श्रीनिवास नागे
सांगली : आकाशवाणीच्या सांगलीसह प्रमुख सात केंद्रांवरील सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेतील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. सव्वाचार तासांसाठी स्थानिक कार्यक्रम बंद करून ‘सांगली आकाशवाणी’चा आवाजच प्रसारभारतीने दाबला आहे. नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना याची सर्वाधिक झळ बसणार आहे.
‘एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ असे धोरण प्रसारभारतीने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी, नागपूर या प्रमुख केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित (रिले) होणार आहेत. तसे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
आकाशवाणी हे लोकरंजन आणि लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात आकाशवाणीची २८ जिल्हा केंद्रे आणि वाहिन्या (प्रायमरी चॅनेल्स) आहेत. त्यावरून स्थानिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होते. स्थानिक घटना, समस्या, लोककला-संस्कृतीचा विचार करून या कार्यक्रमांची निर्मिती होते. त्यातून स्थानिक उद्घोषक-निवेदक आणि कलावंतांना संधी मिळते. संस्कृतीचे प्रादेशिक वैविध्यही जपले जाते.
पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारा मोठा श्रोतृवर्ग आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नाटिका, शेती, लोकशिक्षण आणि कामगारविषयक संवादिका, सामाजिक-कौटुंबिक श्रुतिका, अभिवाचन, बातम्या, संगीत-मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या ‘सांगली आकाशवाणी’ राज्यात अग्रेसर ठरली. आता प्रसारभारतीच्या धोरणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सव्वाचार तास तास, तर नंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरातील सर्वच स्थानिक कार्यक्रम बंद होतील.
त्याऐवजी राज्यातील एकाच प्रमुख (मुंबई) केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याचा सर्वात मोठा फटका नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना बसणार आहे. नैमित्तिक उद्घोषकांना तीनऐवजी दोनच पाळ्यांमध्ये काम मिळेल. स्थानिक कलाकारांना संधी मिळणार नाही.
धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगलीसाठी आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणले. ६ ऑक्टोबर १९६३ रोजी या केंद्रावरून प्रक्षेपण सुरू झाले. नाट्यपंढरीतील या केंद्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. कल्पक अधिकारी, हरहुन्नरी स्थानिक कलावंत, आवाजावर हुकूमत असणारे उद्घोषक-निवेदक, कार्यक्रमांतील वैविध्य यामुळे सर्वदूर महती पोहोचली. मात्र प्रसारभारतीच्या धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे सांगली केंद्राच्या सुस्पष्ट ‘आवाजा’ला खरखर लागली...