जिल्ह्यात लॉकडाऊन झाले आणखी कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:46+5:302021-04-21T04:26:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार आणखी कडक झाला आहे. सध्या सकाळी ९ ते रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार आणखी कडक झाला आहे. सध्या सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुली राहणारी किराणा, बेकऱ्या यासह अन्य दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच चालू राहणार आहेत. मंगळवारी रात्रीपासून नवे नियम लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शासनाचे स्पष्ट आदेश मंगळवारी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश काढले. मंगळवारी रात्री ८ पासून हे नवे आदेश लागू झाले आहेत. यापूर्वी लॉकडाऊन काळात बेकऱ्या, किराणा दुकाने, किराणा बझार, डेअऱ्या, दूध वितरण, मटन दुकाने, फळविक्री, भाजी मंडई, हॉटेल्समधील पार्सल सोय यांना मुभा देण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ८ या काळात ही दुकाने सुरू होती. तरीही याठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सकाळी ७ ते ११ या काळातच या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर ही दुकाने सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला खरेदीसाठी मंडई व होलसेल बाजारात गर्दी होत आहे. फळमार्केटमध्येही नियम माेडले जात आहेत. काही बझारमध्येही किराणा माल खरेदीसाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे या सर्वांवर निर्बंध आले आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेतच नागरिकांना संबंधित माल खरेदी करता येणार आहे. बेकऱ्या, मटन दुकाने, फळविक्री व भाजीपाला विक्रीलाही हे नियम लागू शकतात. सध्याच्या लॉकडाऊनला केवळ दहा दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांसाठी हा नियम लावून लॉकडाऊन कायम ठेवल्यास त्यातही हा नियम राहण्याची शक्यता आहे.
चौकट
यांना असेल बंधन
सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटन, मासे, अंडीसह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य विक्री या सर्वांना आता सकाळी ७ ते ११ या चार तासांचीच परवानगी मिळाली आहे.
चौकट
दिवसभर यासाठी राहील परवानगी
निर्बंध घातलेल्या या सर्व दुकानांमधील किंवा सेवेमधील घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
चौकट
यांना नाहीत निर्बंध
औषध दुकाने, रुग्णालये, अन्य वैद्यकीय सेवा-सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच पेट्रोल पंप यांना वेळेचे बंधन नाही. नव्या निर्बंधातही त्याचा समावेश नाही.