लॉकडाऊनमध्ये महापुराच्या तडाख्याने शेतकरी ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:29+5:302021-07-30T04:28:29+5:30
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार ...
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या विश्वास हेल्पलाइनचे समन्वयक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कालीदास पाटील यांनी सांगितले की, आकस्मिक आपत्तीतून अनेकांना सावरता न आल्याने पूरग्रस्त क्षेत्रातील रहिवासी मानसिकदृष्ट्या खचला असल्याचे दिसून आले आहे. तरुणाईपुढे भवितव्यविषयक अनेक प्रश्न आहेत. लॉकडाऊनमुळे हिरावलेला रोजगार, वर्क फ्रॉम होमचा ताण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताण याला नागरिक तोंड देत होते. त्यातच महापुराचा तडाखा बसल्याने विवंचनेत भर पडली आहे. शेती नापीक होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनामधील सल्ला व समुपदेशन सेवा महापुरामुळे व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील २७ हजार १३० कुटुंबांशी हेल्पलाइनवरून संवाद साधला आहे. यापूर्वीच्या महापुरात ४६ टक्के व्यक्तींमध्ये पुरानंतर मानसिक विकार दिसून आले होते. सध्या अधिक सखोल सर्वेक्षणाची गरज आहे. पूरग्रस्तांमध्ये झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्मक विचार, मानसिक थकवा आदी मनोकायिक विकार आढळत आहेत. त्यांचे समुपदेशन कालीदास पाटील यांच्यासह मानसोपचारतज्ज्ञ शैलजा पाटील, क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील आदी करत आहेत.