दुसऱ्या दिवशीही लॉकडाऊनमुळे सर्व ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:22+5:302021-05-08T04:28:22+5:30
सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस पोलिसांनी कारवाईचा ...
सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसला आहे. माधवनगर रोड, कोल्हापूर रोडसह विश्रामबाग चौकात पोलिसांनी कसून तपासणी सुरू ठेवली होती.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने बुधवारपासून आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासूनच पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली होती. शुक्रवारी सकाळी सांगली-मिरज मार्गावर वर्दळ वाढल्याचे दिसून येताच पोलिसांनी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात बॅरिकेड्स लावून प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांनी फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून शुक्रवारी उपनगरांतही फिरून पाहणी करण्यात आली. कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौक, मंगळवार बाजार चौकात भाजी विक्रीसाठी थांबलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. घरोघरी फिरूनही विक्रीस बंदी असतानाही अनेकजण बिनधास्तपणे फिरत होते. शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असली तरी अनेकठिकाणी फूड डिलिव्हरी देणारे युवक गर्दी करून उभे होते. हॉटेलसमोर अशी गर्दी असल्याने महापालिकेच्या पथकाने या तरुणांनाही समज दिली.
शुक्रवारी उन्हाचा कडाका थोडा कमी हाेत पावसानेही हजेरी लावली होती त्यामुळे रस्त्यावरील नेहमीची वर्दळही रोडावली होती. सायंकाळी तर रस्ता सुनसान होता. तरीही प्रमुख चौकांत पोलीस तैनात होते.
चौकट
सगळ्यांचीच अत्यावश्यक सेवा; पोलीस हैराण
लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले की प्रत्येकजण अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडल्याचे सांगत होता. त्यातही औषधे आणण्यासाठी बाहेर पडल्याचे अनेकजण सांगत हाेते. मात्र, त्यांच्याजवळ औषधाची चिठ्ठी अथवा औषधेही नसत. त्यामुळे चौकशी करताना पोलीसही हैराण झाले होते. वाहनांवर ‘अत्यावश्यक सेवा’ लिहून फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरूच ठेवत त्यांची वाहने जप्त करण्यात आली.