इस्लामपूरकरांना लॉकडाऊनची लस लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:51+5:302021-05-06T04:26:51+5:30
शहरातील मध्यवर्ती असलेल्या गांधी चौकात शुकशुकाट होता. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लॉकडाऊनच्या काळात सकाळी ७ ते ११ ...
शहरातील मध्यवर्ती असलेल्या गांधी चौकात शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : लॉकडाऊनच्या काळात सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर लोकांची गर्दी वाढत चालली होती. कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला होता. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. याचा परिणाम इस्लामपूर शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. औषध दुकाने वगळता, पहिल्याच दिवशी पूर्णत: इतर दुकाने बंद होती.
शासनाने राज्यात १५ एप्रिल ते १ मेपर्यंत पूर्णत: संचारबंदी जाहीर केली होती. यामध्ये काही उद्योगांना सवलत देण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू विक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १ मेनंतर १५ मेपर्यंत पुन्हा संचारबंदी पूर्वीप्रमाणेच वाढविली. सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा, भाजी, फळे विक्रीस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच उपनगरांसह शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत गेली. त्यातच इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने अर्धवट उघडून व्यवसाय सुरू केले. त्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी वाढली. त्यामुळे वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मृत्यू दरही वाढला. यावर उपाय म्हणून येणारे आठ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यातील पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रस्त्यावर तुरळक लोकांची गर्दी दिसत होती.