‘वसंतदादा’च्या कार्यालयास कुलूप
By admin | Published: February 3, 2017 01:02 AM2017-02-03T01:02:33+5:302017-02-03T01:02:33+5:30
कामगारांत खळबळ; ले-आॅफसाठी कुलूप लावल्याचा आरोप
सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह टाईम कार्यालय गुरुवारी कुलूपबंद होते. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कामगारांत खळबळ उडाली. कामगारांच्या ‘ले-आॅफ’साठी कारखान्याच्या कार्यालयास कुलूप लावल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला, तर कुलूप न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा साखर कामगार युनियनने दिला आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील मुख्य प्रशासकीय इमारत व टाईम कार्यालयात सकाळी नेहमीप्रमाणे कामगार आले. मात्र, कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांच्यात खळबळ उडाली. याबाबत कामगारांनी अधिक चौकशी केली; पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या विवाहासाठी कार्यालय बंद ठेवल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. दुपारनंतर कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी कुलूप लावल्याची चर्चा होती. सकाळपासून कामगार मुख्य इमारतीबाहेर ठाण मांडून होते. कामगार युनियनचे सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी कामगारांशी चर्चा केली. त्यानंतर अध्यक्ष विशाल पाटील यांची भेट घेऊन कुलूप काढण्याची मागणी केली.
सध्या कारखान्यात कायमस्वरूपी व हंगामी असे ९५५ कामगार आहेत. गळीत हंगामाची सांगता झाल्याने कायमस्वरूपी ४५५ कामगार कार्यरत आहेत. यंदा कारखान्याने केवळ एक लाख टन गाळप केले आहे. गाळपच न झाल्याने भविष्यात कामगारांचा खर्च कारखान्याला न पेलणारा आहे. त्यासाठी कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व संचालकांनी कामगार युनियनशीही त्यासंदर्भात चर्चा केली आहे. कामगारांच्या ले-आॅफला शेतकरी संघटनेचा विरोध आहे, तर कारखान्यातील कामगार युनियनकडून कायदेशीर ले-आॅफ घेण्याबाबत विचारविनियम सुरू असल्याचे समजते.
कामगारांनी बेकायदेशीर ले-आॅफ घ्यावा, यासाठी अध्यक्षांनी कुलूप लावले आहे. कारखाना बंद पाडण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला. याबाबत सहकारमंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्तांशी संपर्क साधून तक्रार केल्याचे फराटे यांनी सांगितले.
वसंतदादा कारखान्याचे गाळप यंदा कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांच्या पगाराचा बोजा कारखान्यावर पडणार आहे. कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी कामगार युनियनशी चर्चा सुरू आहे. त्यातून सकारात्मक तोडगा समोर येईल. कारखान्याच्या इमारतीला कुलूप लावले आहे. तो कारखाना संचालक व कामगारांचा अंतर्गत प्रश्न आहे.
- विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा साखर कारखाना
वसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय ले-आॅफ देता येणार नाही. त्यामुळे ले-आॅफला आमचा विरोध आहे. कुलूप लावल्याबाबत आम्ही सहकारमंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.
- सुनील फराटे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष