लोकसभेला खासदारांना नव्हे, भाजपला पाठिंबा! : अनिल बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:44 PM2018-12-05T21:44:11+5:302018-12-05T21:46:08+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली.
तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील टेंभूचा पाणीप्रश्न मार्गी लागला असल्यानेच भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तासगाव तालुक्यातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बाबर गुरुवारी तासगाव पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आ. बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका खासदार संजयकाकांसाठी म्हणून नाही. भाजपकडून खासदारांसह कोणीही उमेदवार असला तरी, त्या उमेदवारास मी पाठिंबा देणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची अट न ठेवता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.
ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीकडून अध्यक्षपदाची ‘आॅफर’ होती. मात्र मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लावला. खानापूर, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. काही गावांचा प्रश्न बाकी आहे, तोही लवकरच मार्गी लागेल. त्यामुळेच लोकसभेबाबत मी राज्यात भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील, भाजप उमेदवारास पाठिंबा देणार आहे.
काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ
यापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ आली. निवडून आल्यानंतर त्यांनी साधी भेटदेखील घेतली नव्हती, अशी टीकाही यावेळी आ. बाबर यांनी केली.