Lok Sabha Election 2019: हातकणंगले प्रचाराबाबत महाडिक गटाची जबाबदारी चंद्रकांतदादांनी घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 04:12 PM2019-03-30T16:12:01+5:302019-03-30T16:14:36+5:30
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना महाडिक यांची मनधरणी करण्यासाठी पाठविण्यात आले, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरुन बोलणे झाले.
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना महाडिक यांची मनधरणी करण्यासाठी पाठविण्यात आले, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरुन बोलणे झाले.
सम्राट महाडिक यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शुक्रवार, दि. २९ रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, म्हाडाह्णचे उपाध्यक्ष व विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी सकाळीच पेठनाक्यावरील सम्राट बंगल्यावर धाव घेतली. तेथे नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांची भेट घेऊन युतीच्याच प्रचारासाठी तयारी ठेवावी, अशी विनंती केली. खोत आणि नानासाहेब महाडिक यांची बंद खोलीतही चर्चा झाली.
सी. बी. पाटील म्हणाले की, विकास आघाडीची बैठक घ्या, त्यावेळी आपण येऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्यानुसार सोमवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता नानासाहेब महाडिक महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादी वगळता इतर विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस स्वत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहे. तेच महाडिक गटाची मनधरणी करुन युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात त्यांना सक्रिय करतील.
तोडगा काय निघणार?
महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक व पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी यावेळची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून तयारी चालविली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधी असणाऱ्या गटांमध्ये अस्वस्थता आहे. यावर आता भाजपने पावले उचलली असून आता चंद्रकांत पाटील यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.