Lok Sabha Election 2019 : जयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:22 AM2019-03-30T11:22:11+5:302019-03-30T11:25:01+5:30
वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.
सांगली : वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.
येडेमच्छिंद्र येथे राजू शेट्टी यांच्या प्रचार प्रारंभावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी, आता वसंतदादा व राजारामबापू गटातील वाद संपवून या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी दादा व बापू यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील. नंतर ते मिटलेही होते. दोघे एकत्र आले होते. आता इतिहासातील घटनांना महत्त्व देण्यात अर्थ नाही.
सांगलीची जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचा उमेदवार या जागेवर सातत्याने निवडून येत होता. त्यामुळे जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. खा. राजू शेट्टी यांनी जागावाटपावेळी सात मतदारसंघांची मागणी केली होती.
राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीला दिला, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली. त्यात माझी भूमिका काय? खा. शेट्टी सांगलीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. ते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघ अदलाबदलीत काँग्रेसकडून मागितला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार का, असा प्रश्न करताच, राजकारणात जर-तरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. त्यात मला स्वारस्य नाही, असे म्हणत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दिलीपतात्या पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबतही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.
सतेज पाटील यांच्याशी चर्चा
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना आपण भेटलो आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नांशिवाय उठून काम करण्याची वेळ आली आहे. हातकणंगलेत आवाडे गटाचीही समजूत काढली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.