Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश शेंडगे मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:28 PM2019-03-30T13:28:50+5:302019-03-30T13:32:51+5:30
वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी या आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती, मात्र ऐनवेळी हे नाव बदलून आता प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सांगली : वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी या आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती, मात्र ऐनवेळी हे नाव बदलून आता प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयवार चर्चा झाली. त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार प्रकाश शेंडगेंचे नाव आघाडीने निश्चित केले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाखांच्या घरात धनगर समाजाचे मतदान आहे. प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसी नेते म्हणून आहे. शिवाय जयसिंग शेंडगेंपेक्षा ते राजकारणात अधिक सक्रीय आहेत. त्यामुळेच प्रकाश शेंडगेंच्या गळ््यात उमेदवारीची माळ घालण्यात आली.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, उमेदवारी निश्चित झाली असून तयारीला सुरुवातही केली आहे. जयसिंग शेंडगे हे माझे चुलत बंधूच असल्याने त्यांनीही माझ्या नावाला सहमती दर्शविली आहे. भाजपसारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी मला उमेदवारीबद्दल विचारणा केली होती. त्यांना मी लगेच होकार दर्शविला.
आता वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूक तयारीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही लढण्यासाठीची सर्व तयारी केली आहे. धनगर समाजाला राज्यातील कोणत्याही प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिलेली नाही. त्याचबरोबर अन्य समाजही उमेदवारीपासून वंचित आहेत. या सर्व वंचित समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे.
बहुजन आघाडीची ताकद कळेल!
बहुजन समाजाकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करीत असल्यामुळेच स्वतंत्र आघाडी करून मैदानात उतरावे लागत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात आता वंचित बहुजन आघाडी उतरल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या अडचणी वाढणार आहेत. आमची काय ताकद आहे, हे या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.