Lok Sabha Election 2019 संभाजी पवार यांचा गट संजयकाका यांच्या पाठीशी-सांगलीत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:54 PM2019-04-15T12:54:21+5:302019-04-15T12:56:55+5:30

गेली पाच वर्षे भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते,

Lok Sabha Election 2019 Sambhaji Pawar's Group Sanjaykaka's backing-Sangli Declaration | Lok Sabha Election 2019 संभाजी पवार यांचा गट संजयकाका यांच्या पाठीशी-सांगलीत घोषणा

Lok Sabha Election 2019 संभाजी पवार यांचा गट संजयकाका यांच्या पाठीशी-सांगलीत घोषणा

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची मध्यस्थी

सांगली : गेली पाच वर्षे भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते, त्यामुळे मी नाराज होतो. पण आता सांगली व हातकणंगले या दोन्ही जागी महायुतीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे आमदार सुरेश हळवणकर, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी सायंकाळी संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. 
हळवणकर म्हणाले की, संभाजी पवार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मध्यंतरी काही मतभेद झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याच हातात हवी, यासाठी महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली. त्याला सहमती दर्शवत संभाजी पवार यांनी संजयकाका पाटील यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. 

खा. पाटील म्हणाले की, पवार यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले. आमचे व त्यांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. गत निवडणुकीवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते. पण त्यामुळे आमच्यात कुठेही कटुता नव्हती. पवार यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांचा आशीर्वाद व शक्ती माझ्या पाठीशी राहणार आहे. 

सुधीर गाडगीळ म्हणाले की, संभाजी पवार व माझा संबंध कॉलेज जीवनापासून आहे. मी त्यांचा ‘फॅन’ आहे. पहिल्या आमदारकीपासून मी त्यांच्यासोबत आहे. पाच वर्षापूर्वीच्या घटनांनी मी दु:खी होतो. आता ते आमच्यासोबत आल्याने आनंद झाला आहे.  भूतकाळात काही गोष्टी घडून गेल्या. आता आम्ही एकत्र भाजपचे विचार जनतेपर्यंत पोहोचवू, असे दिनकर पाटील यांनी सांगितले. 

पृथ्वीराज पवार म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी काही समज-गैरसमज निर्माण झाले होते. ते आता दूर झाले आहेत. भाजप-शिवसेनेने आम्हाला कधीच अंतर दिले नाही. भाजपने आमच्यावर पुत्रवत प्रेम केले. उद्धव ठाकरे यांनीही महायुतीच्या मागे ताकदीने उभे राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहोत. 

गौतम पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपच्या पाठीशी राहण्याबाबत सहमती दाखविली. सांगली व हातकणंगले मतदारसंघात आम्ही युतीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणार आहोत. त्यांच्या प्रचारात आजपासूनच सक्रिय होत आहोत.

Web Title: Lok Sabha Election 2019 Sambhaji Pawar's Group Sanjaykaka's backing-Sangli Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.