Lok Sabha Election 2019 वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:30 PM2019-04-02T23:30:14+5:302019-04-02T23:32:34+5:30

वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा

Lok Sabha Election 2019 Son of Rajaram Bapu, son of Vasantdada's son: Jayant Patil | Lok Sabha Election 2019 वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र : जयंत पाटील

Lok Sabha Election 2019 वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र : जयंत पाटील

Next
ठळक मुद्देदादा-बापू वादावरून रंगली प्रचार सभा;एकसंधपणे लढण्याचा घटकपक्षांचा निर्धार

सांगली : वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
सांगलीच्या स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. सभेत अनेक वक्त्यांनी दादा-बापू वादाचा विषय उपस्थित केला. त्यावरून विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी राजकीय टोलेबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले की, मागच्या गोष्टींचा विचार करून कधीही राजकारणात पुढे जाता येत नाही. पुढचा विचार करून जो राजकारण करतो, तोच पुढे जात असतो. त्यामुळे विशाल पाटील यांनी वसंतदादा व राजारामबापू असा भेद मनात बाळगू नये. वसंतदादांच्या ताटात मी जेवलो आहे. वसंतदादांच्या जिल्ह्यातील सर्वात लाडका कार्यकर्ता मीच होतो. आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्यासोबत घालविले आहेत. दादा व बापू यांच्यात तात्त्विक मतभेद होते. ते कधीही एकमेकांशी वैयक्तिक राग बाळगत नव्हते. बाहेरील लोक आक्रमण करू लागले की, दादा-बापू एक होत असत. आताही काही बाहेरचे लोक शहाणपणा शिकवू पाहत आहेत. त्यामुळे आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील वादाचे नंतर पाहू. विशाल पाटील, प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील आणि मी स्वत: बसून मागील विषयांचे काय करायचे ते ठरवू. कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करू नये.

विशाल पाटील म्हणाले की, दादा-बापू हा वाद आता संपुष्टात आला पाहिजे. लोकसभेची यंदाची निवडणूक या वादावर पडदा टाकणारीच आहे. माझी चूक मी मान्य करतो. आता वडीलधारे म्हणून जयंत पाटील यांनी माझ्यामागे उभे राहावे. विश्वजित कदम यांनीही मला सांभाळून घ्यावे.
आ.विश्वजित कदम म्हणाले की, कदम-दादा गट असाही वाद विनाकारण निर्माण केला जातो. वास्तविक पतंगराव कदम कधीच मनात काही ठेवायचे नाहीत. मनात असेल ते बोलून मोकळे होत असत. आमचेही मन तसेच आहे. आमच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याने आनंद वाटला. विशाल पाटील यांची चूक मान्य करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. त्यांना जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य पलूस-कडेगाव मतदार संघातून देण्यात येईल. पण बॅटिंग करताना मैदानात दोन बॅटस्मन असतात, हे लक्षात असू द्या. एक गेला की दुसरा व दुसरा गेला की तिसरा येतो. त्यामुळे आपल्यालाच मिळाले तरच काँग्रेसमध्ये राहू, असा विचार त्यांनी करू नये.

प्रकाश आवाडे, सदाशिवराव पाटील यांनीही, आपसातील गैरसमज दूर करून पुढे गेल्यास ही निवडणूक अवघड नाही, असे मत मांडले. यावेळी खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयश्रीताई पाटील, अरुण लाड, सत्यजित देशमुख, शैलजाभाभी पाटील, डॉ. भारत पाटणकर, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, नामदेवराव मोहिते, सुरेश पाटील, अविनाशकाका पाटील, संजय बजाज, मनोज शिंदे, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, ताजुद्दीन तांबोळी, जितेश कदम, उत्कर्ष खाडे, डॉ. नामदेव कस्तुरे, महेश खराडे उपस्थित होते.

कमरेला पिस्तूल : म्हणजे धाडस नव्हे!
खासदार संजयकाका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांना उद्देशून, ‘संग पाहिला आता जंग पाहा’, असे आव्हान दिले होते. त्याचा समाचार घेत विशाल पाटील म्हणाले, कमरेला पिस्तूल लावून दादागिरी करण्याला धाडस म्हणत नाहीत. आ. सुमनताई पाटील यांच्यासारख्या महिलेला घरात कोंडून दगडफेक करून तुम्ही तुमची मर्दानगी दाखविली आहे. तुमची दादागिरी आम्ही तासगावात येऊन मोडू. तुम्ही माझ्या आडवे येऊ नका. वसंतदादांच्या प्रेमाची ताकद आमच्यात अजूनही अबाधित आहे.
 

संजयकाका सर्व महाराजांना भेटून आले!
मला उमेदवारी मिळू नये म्हणून राज्यातल्या सर्व महाराजांना संजयकाका पाटील यांनी भेटून साकडे घातले. केवळ राजू शेट्टींना ते भेटले नाहीत. म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.
 

साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल
विशाल पाटील यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, आ. विश्वजित कदम यांच्यासमवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने अर्ज दाखल केला.

सांगलीतील प्रचार सभेत बॅट उंचावून नेत्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डावीकडून सुरेश पाटील, जयश्रीताई पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. विश्वजित कदम, अरुण लाड, विशाल पाटील, सदाशिवराव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019 Son of Rajaram Bapu, son of Vasantdada's son: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.