Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या मैदानावर अस्तित्वाचीच तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 05:18 PM2019-04-19T17:18:05+5:302019-04-19T17:19:59+5:30
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व जबाबदारी
अशोक पाटील
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व जबाबदारी घेतली आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले दुसºया फळीतील नेते अस्तित्वासाठी शिवसेनेच्या प्रचारासाठी मंचावर दिसत आहेत. परंतु त्यांच्या पोटात एक अन् ओठात एक असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
इस्लामपूर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर विस्कटलेली विकास आघाडी पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी एकत्र आली आहे. यामध्ये रयत क्रांती संघटनेचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी, भाजपचे विक्रम पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आष्ट्याचे वैभव शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या बरोबरीने काम सुरू केले आहे. परंतु यातील अनेकजण राजकीय अस्तित्वासाठी एकमेकांवरच कुरघोड्या करत आहेत.
राष्ट्रवादीने शेट्टी यांच्यासाठी जोरदारपणे प्रचार सुरू ठेवला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांना राज्यभर फिरावे लागत असले तरी, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. शिराळ्यातही माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी दररोज चार-पाच सभा घेऊन प्रचारात रंगत आणली आहे. त्यांना काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांची साथ आहे.
याउलट वाळवा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आघाडीच्या धर्माला वाटाण्याच्या अक्षता लावत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. सी. बी. पाटील, त्यांचे पुत्र जयराज पाटील यांनीही वेगळी भूमिका घेतली आहे. महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा अॅड. मनीषा रोटे यांनी मात्र जिल्हाभर महिला मेळावे भरवून राजू शेट्टी यांची बॅट हातात घेतली आहे.