मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:09 PM2024-04-13T21:09:40+5:302024-04-13T21:10:04+5:30
सांगली लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे.
सांगली लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला गेली असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान, आता विशाल पाटील ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
'सांगली लोकसभा मतदारसंघातून जर विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली तर वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.आज प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील उमरखेडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी सांगली लोकसभेवर भाष्य केले. या सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले, 'चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, अशी ग्वाही देतो, असंही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, आता वंचितच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केली तर महाविकास आघाडीसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.