Lok Sabha Election Sangli : ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? "सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:06 AM2024-04-06T11:06:40+5:302024-04-06T11:12:31+5:30
Lok Sabha Election Sangli : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून बिनसलं आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला दोन जागा सोडल्या आहेत, परंतु काँग्रेस काही केल्या ठाकरेंसाठी दोन जागा सोडायला तयार नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून बिनसलं आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला दोन जागा सोडल्या आहेत, परंतु काँग्रेस काही केल्या ठाकरेंसाठी दोन जागा सोडायला तयार नाही. यातच ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. तर दुसरीकडे विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता असून मैत्रिपूर्ण लढत करू, असं त्यांचे स्थानिक नेते म्हणत आहेत. यातच संजय राऊत यांचे विशाल पाटलांना संसदेत पाठविण्याबाबतचं वक्तव्य आल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. परंतु विशाल पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत "सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही," असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे.
"मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्यानं संघर्ष करत आहोत. काँग्रेसनंच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे," असं विशाल पाटील म्हणाले.
"काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नातं"
"स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. गुलाबराव पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व.आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नातं तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत," असं त्यांनी नमूद केलं.
"आपण लढू आणि जिंकू"
"या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू..," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही".#सांगली_काँग्रेसचीचpic.twitter.com/i7nK2PRs2C
— Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) April 6, 2024
काय म्हणालेले राऊत?
सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे. पण लोकसभा निवडणूक सांगलीत हे शिवसेनाच लढणार आहे. विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार आहे, असे संकेत राऊत यांनी दिले होते. राऊत यांच्या वक्तव्यामुळे विशाल पाटलांना मविआच्या कोट्यातून संसदेत म्हणजेच राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा काँग्रेससोबत झाल्याचे तर्क लढविले जात आहेत.