संजय पाटील यांनी पाच वर्षात काय केले? - पृथ्वीराज देशमुख
By अविनाश कोळी | Published: April 13, 2024 10:51 AM2024-04-13T10:51:46+5:302024-04-13T10:53:18+5:30
Lok Sabha Elections 2024 : पाच वर्षात खासदार संजय पाटील यांनी काय काम केले. पक्षविरोधी काम करुनही त्यांच्याच पदरात उमेदवारी टाकण्यात आली, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी टीका केली.
पलूस : पाच वर्षात खासदार संजय पाटील यांनी काय काम केले. पक्षविरोधी काम करुनही त्यांच्याच पदरात उमेदवारी टाकण्यात आली, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी टीका केली.
पलूस येथे बुथ प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, पाच वर्षात खासदारांनी सांगली मतदारसंघात पक्षाचे किती कार्यक्रम घेतले? आम्ही पक्षात काम करत असताना काय चुकलो? आम्ही जिल्हा परिषद आणली, महानगरपालिका आणली आणि तुम्ही बैठक न घेताच खासदारांची उमेदवारी जाहीर केली. याची काय गरज होती? ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्याच खासदारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. इच्छुक असूनही आम्हाला का डावलले गेले, याचे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीने द्यायला हवे? पक्षाच्या विरोधात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलणारा माणूस उमेदवार म्हणून कोणत्या आधारावर जाहीर केला?
यावेळी भाजपचे पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, रामानंद पाटील, सर्जेराव नलवडे, रोहित पाटील, विजय पाटील, प्रकाश बिरजे, प्रकाश गडले, संजय सुर्वे, राजेंद्र लाड, दत्तू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
माझी नाराजी पक्षाविरोधात नाही. खासदारांनी पाच वर्षात काय केले, याबाबत बैठकीत प्रश्न उपस्थित केले. पक्षविरोधात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला. त्यांच्याबद्दल पक्षात नाराजी असताना उमेदवारी दिली गेल्याने आम्ही सवाल उपस्थित केले.
- पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार, भाजप