लोकमत इम्पॅक्ट! नाथजल विक्रीत प्रवाशांच्या लुटीची ST कडून दखल; ३० रुपयांत चहा-नाश्त्याचे आदेश
By संतोष भिसे | Published: May 27, 2023 02:57 PM2023-05-27T14:57:12+5:302023-05-27T14:57:44+5:30
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार, एसटीने प्रवाशांसाठी १५ रुपयांच्या सवलतीच्या दरात नाथजल उपलब्ध केले आहे. सर्व स्थानकांमध्ये त्याच्या विक्रीचे ठेके दिले आहेत.
सांगली : राज्यभरातील बसस्थानकांवर नाथजलाची १५ रुपयांची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार `लोकमत`ने रियालिटी चेकद्वारे उघड केला. विविध मार्गांवरील उपहारगृहांमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले. याची गंभीर दखल एसटीने घेतली असून स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज तपासणीचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.
एसटीने प्रवाशांसाठी १५ रुपयांच्या सवलतीच्या दरात नाथजल उपलब्ध केले आहे. सर्व स्थानकांमध्ये त्याच्या विक्रीचे ठेके दिले आहेत. ठेकेदाराला जागाही दिली आहे. पण काही स्थानकांत नाथजल २० रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.
याविषयी गेल्या पंधरवड्यांत `लोकमत`ने राज्यभरात रियालिटी चेक केले. त्यात काही ठिकाणी प्रवाशांची आर्थिक लूट दिसून आली. विक्रेत्यांचा उद्दामपणाही दिसला. प्रवासारम्यान चहा-नाश्ता व जेवणासाठी एसटीने काही खासगी उपाहारागृहांशी करार केला आहे. एसटीने याच उपाहारगृहांवर थांबा घेण्याची सक्ती आहे. प्रवाशांना तेथे ३० रुपयांत हलका नाश्ता व चहा मिळतो. करारात तशी तरतूद आहे. पण त्याचेही सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी एसटीकडे येत आहेत. समाजमाध्यमांवरही तक्रारींचा महापूर आला आहे.
याची दखल घेत महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, परवानाधारक नाथजल विक्रेत्यांकडून वाढीव दराने विक्रीच्या तक्रारींकडे पर्यवेक्षक व अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. खासगी थांब्यांवरील उपाहारगृहांत ३० रुपयांत चहा-नाश्ता मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. संबंधित उपाहारगृहासोबत करारावेळीच ३० रुपयांत चहा-नाश्त्याचे बंधन आहे. पण त्याची अंमलबजावणी आगार किंवा विभागामार्फत होत नाही. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे.
अधिकाऱ्यांवर जबाबदारी
एसटीने आदेशात म्हंटले आहे की, नाथजलाची विक्री छापील किंमतीपेक्षा जास्त दराने होत नाही याची तपासणी वाहतूक पर्यवेक्षकाने दररोज करावी. तपासणी झाली नाही, तर पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकावर जबाबदारी निश्चित केली जाईल. खासगी थांब्यांवरील उपाहारगृहामध्ये ३० रुपयांत नाश्ता दिला जातो याची तपासणी मार्गतपासणी पथके, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक व विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी करावी. होत नसल्यास विभाग नियंत्रकांना लेखी अहवाल द्यावा. त्यानुसार संबंधित उपहारगृहावर कारवाई करता येईल.