लोकसभा निकालाचे काऊंटडाऊन सुरू...: उमेदवारांची धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:38 PM2019-05-20T23:38:05+5:302019-05-20T23:40:28+5:30
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे.
सांगली : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून प्रमुख उमेदवारांच्या कट्टर समर्थकांनी देवाला साकडे घालण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच तिरंगी व चुरशीची लढत यंदा होत आहे. आजवर एकतर्फी किंवा दुरंगी एवढाच सामना येथील नागरिकांनी अनुभवला होता. यावेळी तीन दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशा तीन तुल्यबळ उमेदवारांचा हा सामना संपूर्ण राज्यात चर्चेचा बनला आहे.
राजकीय तज्ज्ञांनाही याठिकाणचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथील निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २३ मे रोजी निकाल स्पष्ट होणार असल्याने आतापासूनच त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मतांची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, मतदारसंघनिहाय कोणाचे पारडे जड राहणार... अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ सध्या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण २0१४ मध्ये त्याला खिंडार पाडून भाजपने तो ताब्यात घेतला. मोदी लाटेचा मोठा परिणाम मागील निवडणुकीत होता. त्यामुळे यंदा भाजपचे उमेदवार व स्थानिक नेत्यांनी स्वबळावर ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यात त्यांना कितपत यश मिळणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यानंतर, या संघटनेमार्फत निवडणूक लढविली आहे. त्यामुळे प्रथमच या निवडणुकीत काँगे्रसचे अस्तित्व दिसत नाही. तरीही स्वाभिमानी, राष्टवादी, काँग्रेस यांच्यासह ५६ पक्ष, संघटनांची आघाडी असल्यामुळे विशाल पाटील यांची उमेदवारी आघाडी म्हणून पाहिली जात आहे.
संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक व भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीत आलेले गोपीचंद पडळकर यांनी तिसरा पर्याय म्हणून या निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे याठिकाणची लढत अधिक रंगतदार व चुरशीची बनली आहे. येथील निकालाचे परिणाम काय राहतील, याचा अंदाज करणेही त्यामुळे कठीण बनले आहे.
समीकरणे बदलणारी : निवडणूक
सांगली लोकसभा मतदारसंघातील निकालाने जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कोणत्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विजय होणार, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर त्याचा परिणाम विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवरही पाहायला मिळाला होता. तसेच परिणाम यंदाच्या निकालानंतरही पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.