चिन्हांचा ‘लोच्या’, गावोगावी आघाड्यांचे पेव--वाळवा तालुक्यात पक्ष बासनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:31 PM2017-10-09T22:31:57+5:302017-10-09T22:33:46+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील धुमशानला सुरुवात झाली आहे.
युनूस शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील धुमशानला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी करून लढण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना दिला आहे. आ. जयंत पाटील समर्थकांचे मोठ्या गावातील मनोमीलन औटघटकेचे ठरल्याने गटा-गटाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.
राज्यातील सत्ताबदल, सदाभाऊ खोत यांच्या रूपाने तालुक्याला मिळालेले मंत्रीपद, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी धाडसाने घडवलेले सत्तांतर यातून राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. सत्तेची ताकद मिळाल्याने भाजप, सेना, रयत क्रांती संघटनेसह महाडिक, नायकवडी गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. प्रस्थापित जयंत पाटील समर्थकांच्या गटा-तटातील वादाचा लाभ विरोधक कितपत उठवतातल यावर विधानसभेचा आखाडा गाजणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थानिक आघाड्या नोंदणीकृत नाहीत. सरपंचपदाच्या उमेदवाराला एक चिन्ह, तर प्रभागात लढणाºया उमेदवारांना वेगळी चिन्हे मिळाली आहेत. एका प्रभागात सत्ताधाºयांना मिळालेले चिन्ह दुसºया प्रभागातील विरोधकांना मिळाले आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची तर मतदान करताना मतदारांची कसोटी लागणार आहे. तालुक्यात ७ ते ९ सदस्य संख्येच्या ५३ ग्रामपंचायती आहेत. ११ सदस्य संख्येची १०, तर १३ ते १५ सदस्य संख्येची १३ गावे आहेत. तर १७ ते १८ सदस्य असणाºया १२ गावांतून संघर्ष सुरू झाला आहे. सरपंचपदासाठी २८ ठिकाणी दुरंगी, २८ जागी तिरंगी, तर १३ गामपंचायतीत चौरंगी लढती होत आहेत. ८ गावात पंचरंगी सामना रंगणार आहे.
वाळवा, ऐतवडे खुर्द, येडेनिपाणी, पेठ, ताकारी, बागणी, शिगाव, बावची, गोटखिंडी, वाटेगाव, नेर्ले, कोरेगाव, कामेरी, साखराळे, बोरगाव अशा गावांतून लक्षवेधी लढतीचे संकेत मिळत आहेत. वाळव्यात हुतात्मा गट विरुध्द राष्ट्रवादी, ऐतवडे खुर्दमध्ये काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादीचे विखुरलेले गट, पेठमध्ये महाडिक विरुध्द राष्ट्रवादी, ताकारीत राष्ट्रवादी विरुध्द सर्व पक्ष, शिगावात राष्ट्रवादीचे दोन गट विरुध्द शिंदे समर्थक स्वरुप पाटील गट, गोटखिंडीत राष्ट्रवादीचे दोन गट आणि हुतात्मा समर्थक अशी तिहेरी लढत, साखराळेत जयंत पाटील व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील एकत्रित विरुध्द इतर पक्ष, कोरेगावात महाडिक विरुध्द राष्ट्रवादी, बोरगावात काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी समर्थक, कामेरीत आमदार नाईक, सी. बी. पाटील, दि. बा. पाटील समर्थक विरुध्द सुनील पाटील, रणजित पाटील गट, वाटेगावात बर्डे विरुध्द पाटील, बागणीत राष्ट्रवादी समर्थक विरुध्द शिंदे समर्थक अशा हाय व्होल्टेज लढती रंगणार आहेत.
तीन ठिकाणी : सरपंच नाही..!
तालुक्यातील डोंगरवाडी, बिचूद आणि फार्णेवाडी (बी) या तीन ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच दाखल न झाल्याने तेथे या जागा रिक्त राहणार आहेत. डोंगरवाडीत आणि फार्णेवाडीत ओबीसी संवर्गाचे आरक्षण आहे. मात्र या संवर्गातील कुटुंबांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंद केले. बिचूदमध्ये विमुक्त जातीचे आरक्षण आहे, तर कासेगावात गायरान जमिनीच्या प्रश्नावरून दोन जागांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.