प्रांत, तहसीलवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: December 10, 2014 10:55 PM2014-12-10T22:55:36+5:302014-12-10T23:49:14+5:30
कडेगावमध्ये उपक्रम : भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न
कडेगाव : कडेगाव येथील तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या दोन्ही कार्यालयात कॅमेऱ्याची करडी नजर असल्यामुळे भ्रष्ट कारभाराला आळा बसला आहे. प्रशासनही गतिमान व पारदर्शक झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पंचायत समिती तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास येथील भ्रष्ट कारभाराला आळा बसेल.
माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली आणि सर्व विभागांची तालुकास्तरावर आवश्यक असणारी सर्व कार्यालये कडेगाव येथे आणली. ती कार्यालये सुसज्ज प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत आहेत.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार हेमंत निकम यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावली आहे. परंतु पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय, नगरभूमापन कार्यालय, सामाजिक वनीकरण, वनपरीक्षेत्र कार्यालय, पोलीस ठाणे अशा सर्व ठिकाणी गतिमान व पारदर्शक कारभार व्हावा, कार्यालयीन शिस्त रहावी, यासाठी
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.
अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी जनतेशी उध्दट बोलतात व काही ठिकाणी कामाला दांडी मारून राजरोसपणे सह्या करून फुकटचा पगार घेतात. काही भ्रष्ट कर्मचारी टेबलाखालून चिरीमिरी मिळाल्याशिवाय जनतेची कामे करीत नाहीत. अशा मनमानीलाही आळा बसणे गरजेचे आहे.
आता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार हेमंत निकम यांनी त्यांच्या कार्यामध्ये प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावून जनतेला दिलासा दिला आहे; परंतु तालुक्यातील अन्य सर्व कार्यालयांमध्येही अशीच शिस्त लावणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
झिरो पेंडन्सीवर भर
कडेगाव तहसील कार्यालयात आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेले प्रस्ताव नियमात बसत असतील, तर तात्काळ मंजूर होत आहेत. रेशन कार्डची कामेही त्वरित होत आहेत. प्रांताधिकारी कार्यालयातही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर प्रांताधिकारी कांबळे यांचा भर आहे. पलूस तालुक्यातील कामे आॅनलाईन कडेगावमधून होत आहेत.