‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने सांगलीत विद्यार्थ्यास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:39 PM2018-11-12T21:39:41+5:302018-11-12T21:40:06+5:30
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील श्रेयस श्रीनिवास जोशी (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने मारहाण करून ...
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील श्रेयस श्रीनिवास जोशी (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने मारहाण करून लुटले. सोमवारी भरदिवसा ही घटना घडली. श्रेयसला दुचाकीवरुन धामणी रस्त्यावर नेले. तिथे बेदम मारहाण करून त्याच्याकडील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून चोरटे पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रेयस कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात अकरावीत शिकतो. दिवाळीमुळे महाविद्यालयास सुटी आहे. तो कॉलेज कॉर्नरवरील खासगी क्लासमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता आला होता. अकरा वाजता क्लास सुटल्यानंतर तो कवलापूरला जाण्यासाठी कॉलेज कॉर्नरवरील पेट्रोल पंपासमोरील थांब्यावर गेला. साडेअकरा वाजता दुचाकीवरुन दोन संशयित चोरटे आले. त्यांनी श्रेयसला ‘कवलापूरला जाण्याचा रस्ता कुठे आहे’, अशी विचारणा केली. श्रेयसने त्यांना ‘हाच रस्ता जातो’, असे सांगितले. यावर चोरट्यांनी ‘तू कवलापूरचा आहेस काय?’ अशी विचारणा केली. श्रेयसने होय म्हणून सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी ‘चल तुला लिफ्ट देतो’, असे म्हणून त्याला दुचाकीवर बसविले.
चोरट्यांनी दुचाकी दुर्गामाता मंदिरापासून व्यंकटेश मंदिराकडे नेली. श्रेयसने ‘इकडे कुठे’, अशी विचारणा करताच चोरट्यांनी मित्राकडून पैसे घेऊन लगेच जाऊ, असे सांगितले. पण चोरट्यांनी त्याला मार्केट यार्डातून शंभर फुटी रस्त्यावरील डी मार्टजवळ नेले. तिथे एक चोरटा उतरुन निघून गेला. दुसऱ्या चोरट्याने श्रेयसला धामणी रस्त्यावर नेले. एका फायनान्स कंपनीसमोर दुचाकी थांबविली. तिथे चोरट्याने श्रेयसच्या तोंडावर ठोसा मारुन मोबाईल काढून घेतला.
चोरटा निघून गेल्यानंतर त्या परिसरातील दिलीप पाटील यांच्या मदतीने श्रेयसने घरच्यांशी संपर्क साधला. सायंकाळी त्याने वडिलांसोबत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार संजय पवार व गुंडोपंत दोरकर यांनी घटनास्थळ मार्गाची पाहणी केली.
दुसरी घटना
दोन दिवसांपूर्वी कॉलेज कॉर्नरवर कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एका तरुणास ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा करून दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन धामणी रस्त्यावर नेले होते. तिथे या तरुणास मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला होता. ही घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा असाच प्रकार घडल्याने पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.