कुपवाडमध्ये महा-ई-सेवा केंद्रातून लुबाडणूक

By admin | Published: July 8, 2015 11:48 PM2015-07-08T23:48:03+5:302015-07-08T23:48:03+5:30

आंदोलनाचा इशारा : आधार कार्ड काढण्यासाठी उकळले जातात पैसे

Looting from Maha-e-Seva Kendra in Kupwara | कुपवाडमध्ये महा-ई-सेवा केंद्रातून लुबाडणूक

कुपवाडमध्ये महा-ई-सेवा केंद्रातून लुबाडणूक

Next

कुपवाड : कुपवाड शहरासह परिसरातील महा-ई-सेवा केंद्रांमधून सध्या नागरिकांची विशेषत: विद्यार्थ्यांची लुबाडणूक सुरू आहे. आधार कार्डासाठी शंभर रुपये आणि इतर विविध प्रकारच्या सुविधांसाठी जादा पैसे उकळले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. व्यापारी संघटनेसह भाजप आणि कुपवाड शहर परिसर संघर्ष समितीने याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कुपवाड शहरासह लगतच्या उपनगरांमध्ये नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. त्यांना दाखल्यांसह इतर शासनाच्या योजनांविषयी सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीचा मोबदलाही मंजूर करण्यात आला आहे. तरीही आधार कार्ड, दाखल्यांसह इतर सुविधांसाठी नागरिकांकडून या मंजूर मोबदल्यापेक्षा जादा पैसे घेतले जात आहेत. मध्यंतरी वखारभागातील ई-सेवा केंद्रावर पैसे घेतल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली होती, तरीही पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. सध्या शाळांमधून विद्यार्थ्यांना आधार कार्ड मागितले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यासाठी ई-सेवा केंद्रामधून विद्यार्थ्यांच्या रांगा दिसून येत आहेत. याचाच फायदा उठवून ई-सेवा केंद्र चालक आधार कार्डासाठी शंभर रुपये उकळत आहेत. त्यासाठी या केंद्रांना शासनाकडून प्रती नोंदणी २७ रुपये मिळतात. मात्र नागरिकांची गरज ओळखून त्यांना लुबाडले जात आहे.
ई-सेवा केंद्रांमधून होणारी लुबाडणूक त्वरित थांबवावी, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश ढंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल कवठेकर आणि कुपवाड संघर्ष समितीचे अध्यक्ष नानासाहेब लवटे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
दोषींवर कारवाईची मागणी
आधार कार्डसह दाखले आणि इतर सुविधांची कामे एजन्सी आणि नागरी सुविधा केंद्रामार्फत करण्यात येत आहेत. तेथे आधार कार्डासाठी शंभर रुपये आणि इतर सुविधांसाठी अधिक रकमेची मागणी केली जात आहे. या प्रकाराची त्वरित चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

Web Title: Looting from Maha-e-Seva Kendra in Kupwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.