प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांचीच लूट, सांगली जिल्ह्यातील तुरचीतील नवव्या सत्राच्या बॅचमधील प्रकाराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:34 PM2024-10-01T13:34:56+5:302024-10-01T13:35:13+5:30

‘खाकी’च्या ज्ञान मंदिराला डाग : कारवाई गुलदस्त्यात

Looting of prospective policemen in training center, sensation in ninth session batch in Turchi of Sangli district | प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांचीच लूट, सांगली जिल्ह्यातील तुरचीतील नवव्या सत्राच्या बॅचमधील प्रकाराने खळबळ

प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांचीच लूट, सांगली जिल्ह्यातील तुरचीतील नवव्या सत्राच्या बॅचमधील प्रकाराने खळबळ

दत्ता पाटील

तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षकांनीच भावी पोलिसांची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशिक्षणार्थींची पिळवणूक करून त्यांच्याकडून वेळोवेळी सक्तीने एक हजार व दोन हजार रुपये गोळा करून लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचे काम प्रशिक्षण केंद्रातील काही प्रशिक्षकांनी केले आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार होती, त्या सर्वांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, ही कारवाई रेकॉर्डवर न आणता गुलदस्त्यात ठेऊन ही बदली नियमानुसार झाल्याचे दाखविण्यात आली आहे.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून २००८ साली तुरची येथे अधिकाऱ्यांसाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. या केंद्रातून सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या दोन बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. त्यानंतर या ठिकाणी पोलिस शिपाई प्रशिक्षण सुरू झाले. पोलिस शिपायांची सत्र क्रमांक नऊची बॅच सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन ३० ऑगस्टला बाहेर पडली.

मात्र, या बॅचच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक काही प्रशिक्षकांकडून झाल्याचे तक्रार संबंधितांनी वरिष्ठांना सांगितली. त्यामध्ये शारीरिक सरावाचा त्रास नको असेल, प्रशिक्षणात सवलती हव्या असतील, तर पैशांची मागणी झाली. एखादा प्रशिक्षणार्थी पैसे देत नसेल, तर त्याला प्रशिक्षण देताना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार झाल्याचे प्रशिक्षणार्थींनी बाहेर पडल्यानंतर सांगितले.

याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर सहभागी चार ते पाच प्रशिक्षकांची प्रशिक्षण केंद्रातील सेवा खंडित करून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले. मात्र, या बदलीची कारवाई शिक्षा ऐवजी रीतसर नियमानुसार झाल्याचे सांगितले जातेय. प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थींची लूट झालेली असताना याबाबत जाहीर वाच्यता झाली नाही. मात्र, पोलिसांना प्रशिक्षण देणाऱ्या ज्ञानमंदिरातच प्रशिक्षकाकडूनच होत असलेल्या लुटीमुळे पोलिस खात्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

लूट झाली मात्र कारवाई नाही?

प्रशिक्षण घेत असताना कारवाई झाल्यास किंवा नापास होण्याची भीती घातली. याबाबत प्राचार्यांकडे प्रशिक्षणार्थींनी रीतसर तक्रार करण्याचे धाडस केले नाही. परंतु, आम्हाला न्याय मिळावा आणि यापुढे असा प्रकार घडू नये, असे काही प्रशिक्षणार्थींनी नाव न देण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला माहिती दिली.

तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांकडून पैसे घेतल्याची कोणतीही तक्रारी आलेली नाही किंवा असा कुठलाही प्रकार झालेला नाही. प्रशिक्षकांबाबत रीतसर तक्रार आल्यास दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल. - धीरज पाटील, प्राचार्य, तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र.

Web Title: Looting of prospective policemen in training center, sensation in ninth session batch in Turchi of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.