शिल्लक रकमेवरील तोटा २० कोटींच्या घरात
By admin | Published: June 19, 2017 12:51 AM2017-06-19T00:51:06+5:302017-06-19T00:51:06+5:30
सांगली जिल्हा बॅँक : रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणाचा आर्थिक फटका; चिंता वाढली
सांगली : जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून जमा झालेले ३१५ कोटी रुपये अजूनही पडून आहेत. गेल्या आठ महिन्यात्ां या अनुत्पादित रकमेच्या माध्यमातून झालेला व्याजाचा तोटा आता वीस कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे बॅँकेची चिंता वाढली आहे.
जुन्या नोटा जमा करण्याबाबतचे आदेश रिझर्व्ह बँकेकडून मिळण्याच्या आशा बँक प्रशासनाला कायम आहेत. ३१५ कोटी पाठविण्यासाठी तब्बल ६३० पेट्या लागणार असल्याने, त्यांची खरेदीही केली आहे. १४ नोव्हेंबरपासून बँकेकडे पैसे पडून असल्याने दररोज ६ लाख रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसत आहे.
केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. जिल्हा बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांमध्ये ग्राहकांनी हजार व पाचशे रुपयांच्या स्वरूपात पैसे जमा केले होते. नोटाबंदी कालावधित चलन पुरवठा नसल्याने जिल्हा बँकेच्या शाखांचे काम ठप्प झाले होते. ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वाधिक २१७ शाखा आहेत. गावातील शेतकरी आणि मजूर या बँकांशी जोडला गेला आहे. जिल्हा बँकेमध्ये ९ नोव्हेंबरनंतर चारच दिवस रकमा जमा करण्यास मिळाले होते. या कालावधित ३०० कोटी ५ लाख १६ हजार रुपये जमा झाले. बँकेत व्यक्तिगत खाती १ लाख ३ हजार ८०४ असून, त्यांच्याकडून २०८ कोटी ७१ लाख १५ हजार रुपये जमा झाले होते.
व्यक्तिगत कर्जदारांची १,०४९ खाती असून, या खात्यांवर ३१ कोटी ६६ लाख ३४ हजार, संस्था सभासद १९ असून, त्यांच्या खात्यावर ५९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपये जमा झाले होते. बँकेकडे जमा झालेल्या नोटांची नाणेवारी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला यापूर्वीच देण्यात आली आहे. नाबार्डकडून पाचशे आणि हजारच्या नोटांची सर्वाधिक रक्कम जमा करण्यात आलेल्या शाखांची माहिती घेतली होती.