Sangli: बेदाणा सौद्याच्या उधळणीतून दहा कोटींचा डल्ला; अडते मालामाल, उत्पादकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:45 PM2024-07-08T13:45:45+5:302024-07-08T13:47:52+5:30
दत्ता पाटील तासगाव : तासगाव बाजार समितीच्या दारात बेदाणा सौद्यासाठी आलेल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बेदाण्याची खुलेआम उधळण केली जाते. ...
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव बाजार समितीच्या दारात बेदाणा सौद्यासाठी आलेल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बेदाण्याची खुलेआम उधळण केली जाते. या उधळणीतून वर्षाला दहा कोटी रुपयांचा डल्ला मारला जात आहे. सौद्याच्या नावाखाली वर्षाकाठी सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण हाेेते. या उधळणीतून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमावण्याचा फंडा राजरोसपणे सुरू आहे. या बेलगाम कारभारावर अंकुश ठेवणार कोण? हतबल बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून तयार केलेला बेदाणा सौद्यासाठी बाजार समितीच्या आवारात अडत्यांच्या हवाली केला जातो. सौद्यात १५ किलोच्या बॉक्समधून सरासरी तीन किलो बेदाण्याची उधळण होते. सौद्यात मिळालेला दर मान्य नसेल, तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळीदेखील अशीच उधळण सुरू असते. तासगाव बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सौदे होतात. बाजार समितीचा लौकिक असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातून बेदाणा उत्पादक सौद्यासाठी येतात. रोटेशननुसार ४० अडत्यांचे सौदे काढले जातात.
सरासरी दोन ते अडीच हजार कलमांचा सौदा होतो. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत, गणपती उत्सव आणि दिवाळी सणाच्या पूर्वी महिनाभर सौद्यात दुप्पट वाढ होते. सरासरी दोन ते अडीच हजार कलमांचा सौदा होत असला, तरी हंगामात तीन ते चार हजार कलमांचा सौदा होतो. प्रमुख १० ते १५ अडत्याकडे दीडशे ते अडीचशे कलमांचा सौदा होतो. जितकी कलमे तितके बॉक्स फोडून, त्या बॉक्समधून व्यापाऱ्यांना दाखवण्यासाठी उधळण होते. सौदे संपल्यानंतर पडलेला बेदाणा अडतेच ताब्यात घेतात.
बाजार समितीने सौद्यातील उधळणीवर ७०० ग्रॅमची तूट दाखविण्याची परवानगी दिली आहे. मात्र अपवाद सोडला, तर बहुतांश अडत्यांकडून दोन ते चार किलोपर्यंत तूट दाखवली जाते. बेदाण्याच्या दराचे गणित अडत्याच्या हातात असल्याने शेतकरी याबाबत तक्रार करत नाहीत. याचाच फायदा घेऊन, अडत्यांकडून बेदाणा उत्पादकांची खुलेआम लूट सुरू आहे.
तासगाव बाजार समितीत होणाऱ्या सौद्यात महिन्याकाठी सरासरी ७० ते १०० टनापर्यंत बेदाण्याची उधळण होते. हंगामात मोठ्या अडत्यांच्या टेबलवर एका साैद्यात तब्बल एक टनापेक्षा जास्त उधळण झालेला बेदाणा पडलेला असतो. वर्षभरात १२० ते १३० दिवस सौदे होतात. वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन, तो पॉलिश करून पुन्हा विकतात. या बेदाण्याची किमान शंभर रुपये किलोप्रमाणे विक्री झाली, तरी तब्बल दहा कोटींचा डल्ला अडत्यांकडून मारला जात आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची बेदाणा उत्पादकांची लूट होत असताना, बाजार समितीने, शेतकरी हिताचे कैवारी समजलेले लोकप्रतिनिधी आणि संघटनांनीदेखील या उधळणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बेदाणा उधळणीवर लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील आठवड्यात ५८०० कलमांचे सौदे
सध्या बेदाणा सौद्याचा हंगाम नाही. तरीही मागील आठवड्यात सोमवारी २१००, गुरुवारी २२०० आणि शनिवारी १५०० अशा ५८०० कलमांचे सौदे झाले आहेत.