सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

By अशोक डोंबाळे | Published: September 11, 2024 05:20 PM2024-09-11T17:20:19+5:302024-09-11T17:21:45+5:30

चार वर्षांमध्ये उत्पन्नात नाही वाढ

Loss of two crores in income of Sangli Bazaar Committee | सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

अशोक डोंबाळे

सांगली : सांगली बाजार समितीच्या तत्कालीन पदाधिकारी आणि प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सुविधा निर्माण केल्या. त्यासाठी ३६ कोटी रुपयांच्या ठेवीमधील ३० कोटींचा चुराडा केला. पण चार वर्षांत बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी वर्षाला दीड ते दोन कोटींचा तोटा होत आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी कारभार सुधारला नाही, तर भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगारही करणे कठीण होणार असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९५० मध्ये सांगली बाजार समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. तेव्हापासून बाजार समिती कधीही तोट्यात गेली नव्हती. वसंतदादांच्या नंतरच्या पदाधिकाऱ्यांनीही बाजार समिती सक्षम करण्यासाठी ३६ कोटींवर ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडत होती, पण मागील संचालकांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली ३६ कोटी रुपयांच्या ठेवींमधील ३० कोटींचा चुराडा केला.

उमदी, सावळीत जागा खरेदी करून विकसित करण्यावर १८ कोटी रुपये खर्च केला. गेल्या चार वर्षांत येथून एक रुपयाचेही उत्पन्न नाही. मिरज दुय्यम बाजार आवारात फुलांसाठी शीतगृह बांधले, पण त्याचा वापर होत नाही. मिरजेत वीस दुकान गाळे बांधले, पण ते भाड्याने गेले नाहीत. यावर चार कोटी २५ लाख रुपयांचा खर्च केला. सांगली मार्केट यार्ड आणि विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये वजन काट्यावर सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च झाला. फळ मार्केटचा वजन काटा बंद असून सांगलीतील वजन काटा तोट्यात आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा चुराडा केला, पण यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींचेच उत्पन्न वाढल्याचे आरोप होत आहेत.

कर वसुलीत खाबूगिरी

सांगली मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये मालाची आवक वाढली आहे. धान्य, हळद, गुळाचे दर दुप्पट झाले आहेत. या सर्वांचा विचार केल्यास करापासूनचे उत्पन्न वाढणे अपेक्षित आहे, पण कर वसुलीतील खाबूगिरीमुळे काही कर्मचारीच गलेलठ्ठ झाले. बाजार समितीच्या उत्पन्नाला मात्र मोठा फटका बसला आहे.

Web Title: Loss of two crores in income of Sangli Bazaar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.