येळदरीत छपराला आग लागून दाेन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:44+5:302021-02-05T07:17:44+5:30
जत : येळदरी (ता. जत) येथील संपदाबाई काशीराम निळे (वय ६५) यांच्या राहत्या घराला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीत ...
जत : येळदरी (ता. जत) येथील संपदाबाई काशीराम निळे (वय ६५) यांच्या राहत्या घराला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत १० ग्रॅम सोन्याची बोरमाळ जळून भस्मसात झाली. याशिवाय एका शेळीसह आठ कोकरांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक म्हैस व एक शेळी भाजून गंभीर जखमी झाली.
संपदाबाई निळे या मल्लाळ गावालगत असलेल्या मळ्यातील गोठ्यात राहतात, तर त्यांचा मुलगा, सून, नातवंडे गावातील घरात राहतात. गाेठ्यातील एका छप्परवजा खाेलीत संपदाबाई राहतात. दुसऱ्या बाजूला जनावरे बांधण्यात येत होती. मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान वाऱ्याने चुलीतील विस्तव पेटल्याने अचानक छपरास आग लागली. आगीत शेळीची आठ लहान कोकरू व एक शेळी यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर एक म्हैस व एक शेळी भाजून गंभीर जखमी झाली. आगीच्या ज्वालामुळे संपदाबाई यांना जाग आल्यानंतर त्या घरातून उठून बाहेर आल्या.
आगीत १० ग्रॅम सोन्याची एक बोरमाळ, प्रापंचिक साहित्य, कपडे, ज्वारी, गहू. तांदूळ आदी साहित्य जळून भस्मसात झाले. घटनास्थळी मंडल अधिकारी संदीप मोरे व तलाठी रवींद्र घाडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
फोटो : ०२ जत १