करुंगलीत घराचे छत उडून दहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:23+5:302021-05-18T04:27:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : शिराळा पश्चिम विभागातील चांदोली, आरळा, सोनवडे, करूंगली, चरण परिसरात रविवारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : शिराळा पश्चिम विभागातील चांदोली, आरळा, सोनवडे, करूंगली, चरण परिसरात रविवारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सोमवारीही सकाळी धुवाॅंधार पाऊस झाला. दुपारी वादळी वाऱ्याने करुंगली येथील बापू गणपती गुरव यांच्या सुमारे दोन हजार चौरस फुटाच्या राहत्या घरावरील संपूर्ण छत उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. कोकरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. यामध्ये गुरव यांचे सुमारे दहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील विद्युत मंडळाचे पणुंब्रे-वारूण सेक्शन ४८ तास बंद असल्याने चांदोली, मणदूर, सोनवडे, आरळा, करूंगली, गुंडगेवाडी, गुढे, मिरूखेवाडी, खोतवाडी यासह वाड्यावस्त्या अंधारात होत्या. हा परिसर जंगली, डोंगरी असल्याने हिंस्त्र प्राण्यांची भीती असते. विद्युत पुरवठा गेले दोन दिवस बंद असल्याने व धुवाॅंधार पाऊस सुरु असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.