राजेंच्या हातात ‘कमळ’.. पण ‘देढ साल बाद’!
By admin | Published: May 23, 2017 11:25 PM2017-05-23T23:25:55+5:302017-05-23T23:25:55+5:30
राजेंच्या हातात ‘कमळ’.. पण ‘देढ साल बाद’!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादीपासून मानसिकदृष्ट्या दूर गेलेल्या उदयनराजेंना भाजपात घेण्यास पक्षाची नेतेमंडळी तयार असली तरी पक्षांतरानंतरची लोकसभेची पोटनिवडणूक कोणालाच परवडणारी नसल्याने ‘एक-दीड वर्षानंतर बघू’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने उदयनराजेंना बाजूला ठेवून बहुमत मिळविले असल्याने आगामी काळातही राजेंना सोबत घेतले जाणारच नाही, असे अंदाज बांधले जात आहेत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांना सावरून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ‘आजूबाजूला चुकीची मंडळी असली की नेता अडचणीत येतो,’ असे स्पष्ट करून भिलारमध्ये पवारांनी उदयनराजेंना सावरून घेतले. जणू त्यांना ‘क्लीन चीट’ दिली. मात्र, त्यांच्या भोवती असणाऱ्या मंडळींवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे पवारांच्या मनात उदयनराजेंबाबत अजूनही सहानुभूती असल्याचा ‘मेसेज’ लोकांमध्ये गेला. असे असले तरीही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा उदयनराजेंना असलेला कडाडून विरोध तसूभरही कमी झाला नाही.
दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारने तीन वर्षे पूर्ण केली आहेत. आता उरलीत दोन वर्षे. या कालावधीत विकासकामांचे ब्रँडिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: साताऱ्यात भाजपला लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नव्हते. या बाबी लक्षात घेऊन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात जिल्ह्यात दोन दौरे केले.
भिलार दौऱ्यानंतर मुख्यमंत्री सलग दोन दिवस साताऱ्यात मुक्कामी होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींची चाचपणी केली. मागील विधानसभेतील भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी राजकीय परिस्थिती जाणून घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा-जावळी, वाई, कऱ्हाड उत्तर व दक्षिण या चार मतदार संघामध्ये यश मिळविण्यासाठी काय धोरण आखावे लागेल, याची चर्चाही झाली.
आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून कोण उमेदवार असू शकतो, याचीही माहिती घेण्यात आली.
सध्याच्या घडीला राष्ट्रवादी नेत्यांसोबत खासदार उदयनराजे भोसले यांचे संबंध प्रचंड बिघडले आहेत. हे लक्षात घेता खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाऊ शकते काय, अशी चर्चा झाली.
दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादीचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजपच असणार, हे आता स्पष्ट झाले आहे. काँगे्रस व राष्ट्रवादीचे विविध तालुक्यांतील प्रमुख मंडळी भाजपमध्ये गेली आहेत. अजूनही पक्षप्रवेशाचे लोण वाढण्याची शक्यता जास्त आहे. ही परिस्थिती भाजपतर्फे लोकसभा निवडणुका लढणाऱ्या उमेदवारासाठी पोषक ठरणारी आहे. त्यामुळे उदयनराजेंसारखा तगडा नेता उमेदवार म्हणून आयताच मिळाला तर भाजपला नक्कीच चालू शकते.
राजेंना चौकटीत कसं ठेवणार?
उदयनराजे हे कधीच एका चौकटीत बसणारे नेते नाहीत.कोणत्याच पक्षाची त्यांना ‘अॅलर्जी’ नसली तरीही कोण्या एका पक्षाच्या दावणीला बांधून राहण्याची मानसिकताही नाही. मागे एकदा खुर्च्यांच्या थरावर बसून सर्व पक्षांपेक्षा आपण मोठे आहोत, हे सूचित केले होते. नरेंद्र मोदी हे रायगडावर आले होते, तेव्हा निरोप मिळूनही ते सोहळ्याला गेले नाहीत. नोटाबंदी काळात ‘कोण मोदी? मोदी तर आमच्या साताऱ्यात पेढेवालेही आहेत,’ असे म्हणत त्यांंनी कोटी केली होती. भाजपतर्फे राज्यमंत्री पद मिळूनही नंतर पक्षबदल केला होता. त्यामुळे राजेंना पक्षात घेण्यापूर्वी भाजप नेते दहादा विचार करत आहेत.