शिराळ्यात नागपंचमीवेळी लाऊडस्पीकरवर बंदी, ड्रोनने ‘वॉच’; कायद्याचे पालन करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:27 PM2022-07-21T14:27:33+5:302022-07-21T14:28:06+5:30
नागपंचमीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील ५२ जणांना तडीपारीचे आदेश
शिराळा : येथील नागपंचमी धार्मिक परंपरेचा मान राखून, कायद्याचे पालन करून प्रबोधनात्मक ठरेल अशी साजरी करा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी बुधवारी केले. कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर (लाऊड स्पीकर) कडक कारवाई करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलीस व वनविभागामार्फत दि. १ ते दि. ४ ऑगस्टपर्यंत बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.
दि. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या नियोजनासाठी येथील तहसील कार्यालयात आयोजित शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी योगेश पाटील, रेणुका कोकाटे, सहायक वनसंरक्षक अजित साजन, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी खिलारी म्हणाले, उत्सव साजरा करत असताना आपल्याकडून नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. लाखो लोक यादिवशी येतात. त्यामुळे सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. वनविभागाने जनजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा. मिरवणूक मार्ग तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक गोष्टी पुरविण्यात याव्यात.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, नायब तहसीलदार सचिन कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव वाघ, दीपक जाधव, सम्राट शिंदे, अर्चना गायकवाड उपस्थित होते.
५२ जणांना तडीपारीचे आदेश
शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपंचमीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील ५२ जणांना तडीपारीचे आदेश देण्यात येणार आहेत. ७५ डेसिबलवरील ध्वनिक्षेपकांवर कारवाई केली जाईल.
आठवडा बाजार रविवारी
सोमवार दि. १ ऑगस्टचा बाजार रविवार दि. ३१ रोजी भरणार आहे. आरोग्य विभागामार्फत नागपंचमीच्या दिवशी बूस्टर डोस देण्यासाठी पथक, महसूल, वन, पोलीस विभागामार्फत विविध शासकीय योजनांचे फलक, डिजिटल लावण्यात येणार आहेत.