मिरजेत शिवभक्तांनी आणली २८ फुटांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती, गुरुवारी मिरवणूक
By अविनाश कोळी | Published: May 8, 2024 08:50 PM2024-05-08T20:50:54+5:302024-05-08T20:52:09+5:30
संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.
मिरज : मिरजेतील ‘आम्ही शिवभक्त’ संघटनेच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणजेच तब्बल २८ फुटी शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली आहे. गुरुवारी (९ मे) मिरजेत या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरजेत शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाच्या शिवजयंतीत २८ फुटी उंच शिवरायांची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून ही मूर्ती आणण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी मिरजेत ही मूर्ती दाखल झाली आहे. गुरुवारी मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता गुजरातमधील सानंदचे आमदार कनुभाई पटेल यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. त्यानंतर साडेपाच वाजता नदीवेस कोळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री दहा वाजता शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता होईल. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी -
संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.
दरवर्षी आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत मोठी मिरवणूक काढण्यात येते. यंदा २८ फुटी मूर्ती आणून उत्सवात नवा रंग भरण्याचा प्रयत्न आहे. संघटनेची मिरवणूक पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी मिरज व परिसरातील ग्रामीण भागातूनही शिवभक्त गर्दी करीत असतात. यंदा मूर्ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.
- विकास सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष, आम्ही शिवभक्त संघटना, मिरज.