मांगलेतील दीड लाखाच्या रोकडसह एटीएम यंत्र लंपास ;चोरीसाठी जीपही पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:45 PM2020-01-01T20:45:21+5:302020-01-01T20:47:06+5:30
बीट हवालदार अशोक जाधव यांनी शोध घेतला असता, ही जीप मांगले-शिराळा रस्त्याच्या बाजूला फकीरवाडी-इंग्रुळ या आडरस्त्याला आढळली. जीपची पाहणी केली असता, एटीएम यंत्राचा रंग व काही खुणा आढळल्या. त्यामुळे चोरट्यांनी तेथे थांबून यंत्र अन्य वाहनाने पळवून नेल्याचे स्पष्ट होत आहे.
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील बसस्थानक परिसरातील टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम यंत्रगॅस कटरच्या साहाय्याने कापून ते जीपमधून पळवून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या एटीएममध्ये १ लाख ४८ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन ते चार चोरट्यांनी पाळत ठेवून ही लूट केली. चोरट्यांनी या लुटीसाठी बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचा वापर केला.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात केवळ जीप चोरीला गेल्याची नोंद होती. टाटा इंडीकॅश कंपनीचे अधिकारी फिर्याद देण्यासाठी आले नसल्याचे सांगण्यात आले.मांगले येथील बसस्थानक परिसरात एटीएम आहे. सोमवारी रात्री अ़ज्ञातांनी ते फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीच संबंधित जागा मालकाने कंपनीला चोरीबाबत माहिती दिली होती. मंगळवारी मध्यरात्री पुन्हा त्याच चोरट्यांनी एटीएम लुटले. लुटीपूर्वी चोरट्यांनी बसस्थानक परिसरात उभी असलेली खासगी वाहतूक करणारी जीप (क्र. एमएच १७-४९६१) पळवली. तीन ते चार लुटारूंनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून गॅस कटरने एटीएम यंत्राचा वरील भाग कापून बाजूला केला. म
धील भाग कापण्यास वेळ लागत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे असलेला भाग उचलून तो जीपमधून पळवून नेला. हा प्रकार सकाळी नऊ वाजता जागामालक इकलाख सुतार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना लुटीची माहिती दिली, मात्र सायंकाळपर्यंत कोणीही प्रमुख अधिकारी आले नव्हते. पैसे भरणारे अधिकारी सायंकाळी साडेचारला दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
एटीएममध्ये शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी दोन लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. त्यावेळी पूर्वीचे ४६ हजार ५०० रुपये मिळून यंत्रात २ लाख ४६ हजार रुपये होते. यापैकी चार दिवसात ग्राहकांनी ९८ हजार २०० रुपये काढले होते, तर १ लाख ४८ हजार ३०० रुपये शिल्लक होते. ते पैसे लंपास झाल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, रात्री बसस्थानकासमोर उभी केलेली जीप जागेवर नसल्याचे मालक हैबती दशवंत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली. बीट हवालदार अशोक जाधव यांनी शोध घेतला असता, ही जीप मांगले-शिराळा रस्त्याच्या बाजूला फकीरवाडी-इंग्रुळ या आडरस्त्याला आढळली. जीपची पाहणी केली असता, एटीएम यंत्राचा रंग व काही खुणा आढळल्या. त्यामुळे चोरट्यांनी तेथे थांबून यंत्र अन्य वाहनाने पळवून नेल्याचे स्पष्ट होत आहे.
बुधवारी ३१ डिसेंबर असल्याने रात्री रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. मध्यरात्री गावातून एक जीप भरधाव गेल्याचे काहींनी पाहिल्याचे सांगण्यात आले. या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरेआहेत, मात्र बॅटरी खराब झाल्याने ते बंद असल्याचे सांगण्यात आले.