सांगली जिल्ह्यात लम्पीने १० जनावरांचा मृत्यू, नवीन ११० बाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:24 PM2022-10-20T15:24:12+5:302022-10-20T15:24:36+5:30
लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे
सांगली : जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा फैलाव वाढत असून संसर्गाचा विळखा पसरत आहे. बुधवारी दिवसात विक्रमी ११० जनावरांना लम्पीची बाधा झाली असून १० बाधित जनावरांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे ४४९ जनावरे लम्पीमुक्त झाले आहेत.
लम्पी त्वचा रोगाने बाधित होणाऱ्या पशुधनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधित जनावरांची संख्या दीड हजाराच्या घरात गेली आहे. बाधित असलेल्या ९१९ जनावरांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन महिन्यापासून लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग सुरू झाला आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. तरीही लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.
बुधवारी नव्याने विक्रमी ११० जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात एक हजार ४४९ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला असून आत्तापर्यंत ९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ४४९ जनावरे आजारातून बरी झालेली आहेत.
लसीकरणाच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह
जिल्हा प्रशासनाकडे तीन लाख तीन हजार शंभर लसीचे डोस प्राप्त झाले होते. परंतु, लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लसीकरण झाल्यानंतर सुमारे २८ दिवसांनंतर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने लसीकरणाचा प्रभाव झाला की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
लम्पीचे तालुकानिहाय बाधित जनावरे
आत्तापर्यंत लम्पीने बाधित झालेल्या जनावरांची तालुकानिहाय संख्या : मिरज तालुका ४४३, आटपाडी ९५, पलूस २००, वाळवा ३२२, खानापूर ९३, तासगाव ९१, कडेगाव ३६, कवठेमहांकाळ ८८, जत ७५, शिराळा २२.