स्वस्तात सोन्याचे आमिष, मिरजेत पिता-पुत्रास अटक; भामटे गुजरातचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:51 PM2022-09-28T16:51:00+5:302022-09-28T17:05:28+5:30
हाॅटेल व्यावसायिकाला नकली सोने विक्री करताना संशयावरून दोघांना पकडण्यात आले.
मिरज : वीस लाख रुपयांत दोन किलो सोने देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या केशवभाई प्रेमाभाई मारवाडी (वय ६०), मुकेश केशवभाई मारवाडी (वय ३०, दोघे रा. नोबलनगर, नरोडा, अमदाबाद, गुजरात) या दोघा पिता- पुत्रांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली. हाॅटेल व्यावसायिकाला नकली सोने विक्री करताना संशयावरून दोघांना पकडण्यात आले.
कुडची (ता. रायबाग, जि. बेळगांव) येथील हॉटेल व्यवसायिक सागर महादेव चव्हाण (वय २८) यांना १० लाख रुपये प्रतिकिलोप्रमाणे दोन किलो सोने देण्याचे आमिष मारवाडी पिता- पुत्रांनी दाखवले होते. सागर चव्हाण यांनी मिरजेजवळ बेडग आडवा रस्ता येथे सोने खरेदी व्यवहारासाठी दोघांना पाचारण केले. सोमवारी सकाळी ११ वाजता पिता- पुत्र एका पिशवीतून सोन्याचा हार घेऊन आले. त्यांनी दोन किलो वजनाचा ३० लडी असलेला मण्याचा पिवळ्या धातूचा हार पिशवीतून काढून दाखवला. मात्र, हा हार नकली असल्याचा संशय आल्याने सागर चव्हाण यांनी बापलेकांना पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
ग्रामीण पोलिसांनी सोन्याच्या हाराची पडताळणी केल्यानंतर सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी भामट्या बाप- लेकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.