Sangli: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, बोरगावातील एकाची साडेतीन कोटींचा फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 06:37 PM2024-12-05T18:37:02+5:302024-12-05T18:38:20+5:30
ऑनलाइन व रोखीने दिली रक्कम
तासगाव : बोरगाव (ता. तासगाव) येथील अरुण नानासाहेब पाटील यांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, त्याचा ५ टक्के परतावा दरमहा देतो, असे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी सचिन पाटील, बोरगाव व अमय चव्हाण, तासगाव या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा तासगाव पोलिसांत दाखल झाला आहे.
तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अरुण पाटील हे तासगाव तालुक्यातील बोरगाव गावचे रहिवासी असून, ते शेती करतात. त्यांच्याच गावातील सचिन पाटील हा त्यांच्या परिचयाचा आहे. सचिन पाटील यांनी तासगाव येथील अमेय चव्हाण हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा ५ टक्के परतावा देतो, तुम्ही पैसे गुंतवा असे आमिष त्याला दाखवले. या आमिषाला बळी पडून अरुण याने व त्याच्या काही मित्रांनी सचिन पाटील यांच्या पत्नीच्या नावे रक्कम जमा केली. ती रक्कम सचिन याने चव्हाण याच्याकडे गुंतवणूक करण्यास दिली. ही फसवणूक सन २०२० ते २०२२ या कालावधीत झाली आहे.
ऑनलाइन व रोखीने दिली रक्कम
अरुण पाटील यांनी वेळोवेळी ऑनलाइन व रोखीने दिलेली रक्कम ५ कोटी ३० लाख रुपये असून, त्यापैकी १ कोटी ८० लाख रुपये हे सचिन पाटील यांनी अरुण यांना परत दिले आहेत. मात्र, उर्वरित ३ कोटी ५० लाख रुपयाची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे. हे अरुण पाटील यांच्या लक्षात आली. याप्रकरणी सचिन पाटील व अमेय चव्हाण यांच्यावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली.