क्रिप्टो करन्सीतून चौपट परताव्याचे आमिष; सांगलीतील दोघींना १२ लाखांचा गंडा, पाचजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 04:00 PM2023-06-30T16:00:33+5:302023-06-30T16:01:46+5:30
संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे आले लक्षात
सांगली : क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गुंतविलेल्या रकमेच्या चौपट परतावा देण्याच्या आमिषाने दोन महिलांना सुमारे बारा लाखाचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जयश्री जालिंदर बदडे (रा. शिव पॅराडाईज अपार्टमेंट, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांनी पाचजणांविरोधात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये निर्मला सूर्यकांत सांगावकर (रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, गणेशनगर, सांगली), प्रशांत तुकाराम पठाणे (रा. गणेशनगर, सांगली), विशाल भीमराव कोरेगावकर (रा. तळसंदे, ता. हातकणंगले), व्यंकट मुळके (पूर्ण नाव माहीत नाही), विक्रम व्यंकट मुळके (रा. लातूर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आणि फिर्यादी जयश्री बदडे एकमेकांच्या ओळखीच्या आहेत.
बदडे यांना ‘पीएलसीयू अल्टीमा’ या क्रिप्टो करन्सीच्या आभासी चलनात गुंतवणूक केल्यास एक वर्षात चौपट परतावा मिळू शकतो, असे सांगण्यात आले. फिर्यादी बदडे यांचा त्यावर विश्वास ठेवत मुलगा अजिंक्य आणि पुतण्या सार्थक यांच्या मोबाईल ॲपवरून बँक खात्यावर चार लाख ७२ हजार ४०० रुपये जमा केले, तसेच रोख दोन लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे शहरातील धनश्री कल्लाप्पा खोत यांनी पाच लाख रुपये जादा परताव्याच्या आमिषाने संशयितांना दिले होते.
मे २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केली होती. जून २०२३ पर्यंत काहीच परतावा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर बदडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली