गीतकार चिंतामणी पोतदार काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:18+5:302021-09-22T04:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फोटो : २१०९२०२१ चिंतामणी पोतदार सांगली : कर्णमधुर गीतांनी रसिकांना भुरळ घालणारे शब्दप्रभू गीतकार चिंतामणी बाबूराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
फोटो : २१०९२०२१ चिंतामणी पोतदार
सांगली : कर्णमधुर गीतांनी रसिकांना भुरळ घालणारे शब्दप्रभू गीतकार चिंतामणी बाबूराव पोतदार (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पोतदार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीतील रसिक स्नेह्यांनी शोक व्यक्त केला. हरहुन्नरी चित्रकार आणि कलंदर गीतकार अशी चिंतामणी पोतदार यांची ओळख होती. रुढार्थाने कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही कला क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. फटाकडी, सासूरवाशीण, सासर-माहेर, कळतंय पण वळत नाही, महादेवाचा नंदी, पटलं तर व्हय म्हणा, जोरदार, धमाकेदार, रिक्षावाली, अन्याय या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले.
चिंतामणी पोतदार यांचा उमेदीचा काळ सांगलीच्या भावे नाट्यगृहात गेला. अनेक मराठी नाटकांचे बॅनर्स, नेपथ्य त्यांच्या कुंचल्यातून साकारले. रंगकर्मी दिलीप परदेशी यांच्यासोबत त्यांची विशेष भट्टी जमली होती. त्यांच्या अनेक नाटकांना नेपथ्यासाठीचे पुरस्कारही मिळाले होते. भावे नाट्यगृहातील विष्णुदास भावे यांचे रंगचित्र पोतदार यांच्याच कुंचल्यातून साकारले आहे. आनंद चित्रपटगृहातही अनेक मराठी चित्रपटांचे बॅनर त्यांनी रंगविले.
पोतदार यांनी शेकडो गाणी लिहिली, त्यातील अनेक चित्रपटांतून रसिकांपर्यंत पोहोचली. त्यांनी शेकडो मंगलाष्टकाही लिहिल्या. अनेक दिग्गजांच्या विवाहात त्या गायिल्या गेल्या. निर्माते अण्णासाहेब घाटगे, संगीतकार बाळ पळसुले यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांसाठी साकारलेले अनेक बॅनर्स विशेष गाजले. त्यांनी चितारलेल्या स्वागत कमानी सांगलीतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरल्या होत्या. उतारवयात काही काळ सांगलीवाडीत आणि सध्या घनश्यामनगरमध्ये त्यांचा मुक्काम होता. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
चौकट
गाजलेली गाणी
कुठं कुठं जायाचं हनीमूनला, थाप मारून थापाड्या गेला, रंगू बाजारला जाते, बुच काढून बाटली फोडा यासह अनेक गाजलेली गीते पोतदार यांच्या लेखणीतून उतरली होती. सुषमा शिरोमणी आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी सुपरहिट ठरली. मुंबईच्या मराठी चंदेरी दुनियेत न रमलेले चिंतामणी अखेरपर्यंत सांगलीतच राहिले. दादा कोंडके मुंबईतूनच आपण लिहिलेली गाणी त्यांना दूरध्वनीवरून ऐकवून दाखवायचे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला होता.