यंत्रमाग व्यवसाय उद्यापासून १५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:46+5:302021-01-25T04:27:46+5:30
देशातील विकेंद्रित यंत्रमाग लघुउद्योग गेल्या काही वर्षांपासून डबघाईस आला असताना गेल्या महिन्याभरात सूत बाजारात झालेली दीडपट दरवाढ व आता ...
देशातील विकेंद्रित यंत्रमाग लघुउद्योग गेल्या काही वर्षांपासून डबघाईस आला असताना गेल्या महिन्याभरात सूत बाजारात झालेली दीडपट दरवाढ व आता त्यापाठोपाठ दररोज मोठ्या प्रमाणातील दरघसरणीमुळे यंत्रमाग व्यवसायास अक्षरश: जुगाराचे स्वरूप आले असल्याची तक्रार यंत्रमाग व्यावसायिकांनी केली आहे. दिवाळीच्या दरम्यान ३२ काउण्टच्या सूताचे दर १८० रु. किलो होते, तर कापसाचे दर ४१ हजार प्रतिखंडी स्थिर होते. त्यानंतर अचानक सूत दरात दररोज ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात येऊन लागली व महिन्याभरात हे दर दीडपट वाढून २७० रुपयांपर्यंत गेले. मात्र, या वाढीव दराच्या तुलनेत कापडास वाढीव दराची मागणी नव्हती. हा प्रकार वस्रोद्योग साखळीतील सर्वच घटकांच्या दृष्टीने नुकसानीचा आहे. त्यामुळे सूत व्यापाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या प्रयत्नात यंत्रमागधारक पूर्णपणे तोट्यात गेला आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून व या व्यवसायात वेठीस धरणाऱ्या या गैरप्रवृत्तीवर कारवाई व्हावी, यासाठी विटा येथील यंत्रमाग व्यवसाय दि. २६ जानेवारीपासून १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितले.
फोटो - यंत्रमागाचा घेणे.