माडगुळेतील महिलेचा खून पतीकडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 03:41 PM2019-04-18T15:41:37+5:302019-04-18T15:43:17+5:30
दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा
सांगली : दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी अनिल सीताराम झोडगे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे.
माडगुळे (ता. आटपाडी) येथील आशाबाई अनिल झोडगे (४५) या महिलेचा अज्ञाताने कात्रीने गळ्यावर वार करून खून केला होता. रविवार, दि. ७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. आशाबाई झोडगे या पतीसह शेतात कामाला गेल्या होत्या. उन्हामुळे त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांना पती अनिल यांनी घरी आणून सोडले व परत ते शेतात कामाला निघून गेले. त्यानंतर दुपारी १ ते २ च्या सुमारास शिवणकामासाठी वापरण्यात येणाºया धारदार कात्रीने आशाबाई यांच्या गळ्यावर वार करून अज्ञाताने त्यांचा खून केला. त्यांची सासू जेव्हा बाहेरून घरी आली, तेव्हा आशाबाई
रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते. प्रथमदर्शनी रक्ताची उलटी झाल्याने त्या बेशुद्ध पडल्याचे समजून नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी गळ्यावर जखम केल्याने रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडे सोपविला. पिंगळे यांनी एक पथक तयार करून खुनाचा तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकाने सर्व संशयितांची कसून चौकशी केली. आशाबाई यांचा पती अनिल याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आशाबाईच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केल्याचे त्याने सांगितले. अनिल झोडगे याला एलसीबीने अटक करून पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.