मदनभाऊंचे स्मारक, पुतळा कामास मान्यता

By Admin | Published: November 2, 2015 10:55 PM2015-11-02T22:55:21+5:302015-11-02T23:58:07+5:30

महासभेत निर्णय : दोन डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार

Madanbhau's memorial, statue recognition | मदनभाऊंचे स्मारक, पुतळा कामास मान्यता

मदनभाऊंचे स्मारक, पुतळा कामास मान्यता

googlenewsNext

सांगली : काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांचे स्मारक व पुतळा उभारणीच्या कामाला खर्चासह सोमवारी महासभेत मंजुरी देण्यात आली. येत्या दोन डिसेंबरपर्यंत पुतळा व स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. सभेत कुपवाड प्रभाग कार्यालय सभागृहाचे नामकरण, क्रीडांगण व खुल्या भूखंडाला मदनभाऊंचे नाव देण्यासही मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्यावतीने मदनभाऊ यांचे स्मारक व पुतळा उभारणी केली जाणार आहे. या विषयाला सोमवारी सभेत मान्यता देण्यात आली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी पालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गोरगरीब नागरिकांसाठी एमआरआय यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. प्रदीप पाटील व मृणाल पाटील यांनी, नेमिनाथनगर येथील खुल्या भूखंडाला कुंपण घालून त्या जागेला मदनभाऊंचे नाव देण्याची सूचना केली. नगरसेवक विजय घाडगे यांनी, कुपवाड येथील खुल्या जागेवर क्रीडांगणाचा विकास करून मिनी स्टेडियम उभारावे, त्याला मदनभाऊंचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर शेडजी मोहिते यांनी, हा भूखंड कर्मवीर सोसायटीतील असून तेथील नागरिकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत मांडले.
नगरसेवक राजेश नाईक यांनी, माधवनगर रस्त्यावरील त्रिकोणी भूखंडावर मदनभाऊंचा पुतळा उभारण्याची सूचना मांडली. त्याला स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनीही अनुमोदन दिले. गौतम पवार यांनी स्मारक व पुतळ्याचे काम पूर्ण होण्यासाठी त्याच्या खर्चासह आराखडा तयार करावा. एकाचवेळी सर्व गोष्टींना मान्यता घ्यावी. वसंतदादांचे स्मारक तेरा वर्षे रखडले आहे, तसा प्रकार होऊ नये, असे मत मांडले. विष्णू माने यांनी, कुपवाड शहरात उद्यान विकसित करून त्याला मदनभाऊंचे नाव देण्याची मागणी केली.
गटनेते किशोर जामदार म्हणाले की, स्मारक, पुतळा व तेथे उद्यान उभारण्याचे काम दोन डिसेंबरपूर्वी करण्याचा प्रयत्न आहे. मदनभाऊंच्या नेतृत्वाला शोभेल असेच स्मारक उभे केले जाईल, असे सांगितले. महापौर कांबळे यांनी, समाधीस्थळाचे सुशोभिकरण प्राधान्याने पूर्ण केले जाईल. मदनभाऊंची जयंती दोन डिसेंबर रोजी भव्य स्वरुपात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. (प्रतिनिधी)

स्फूर्तिस्थळ : आणखी स्मारके नकोत!
कृष्णा नदीकाठावरील स्फूर्तिस्थळावर सध्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील, खासदार प्रकाशबापू पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मदनभाऊ पाटील या दादा घराण्यातील व्यक्तींची स्मारके आहेत. मदनभाऊंच्या अंत्यविधीवरूनही काही वाद निर्माण झाल्याची चर्चा तेव्हा होती. या विषयावरूनच सोमवारी महासभेत माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर यांनी, यापुढे तिथे अन्य कोणाचेही स्मारक उभे करू नये, असा ठराव महापालिकेने करावा, अशी सूचना मांडली. पण महापौरांनी या सूचनेला बगल दिली.


आयुक्त गैरहजर राहिल्याने नाराजी
महासभेला आयुक्त अजिज कारचे गैरहजर होते. ते हरित न्यायालयाच्या सुनावणीसाठी पुण्याला गेले होते. त्याला शेखर माने यांनी आक्षेप घेतला. आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे पालिकेचे कामकाज ठप्प होत असल्याचे सांगितले. महापौरांनी, मुख्यालय सोडण्यापूर्वी आयुक्तांनी परवानगी घ्यावी, असे आदेश दिले.

Web Title: Madanbhau's memorial, statue recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.