कुपवाडच्या कार्यालयालाही मदनभाऊंचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 11:19 PM2016-02-11T23:19:21+5:302016-02-11T23:33:35+5:30

हारूण शिकलगार : प्रभाग समिती क्र. ३ च्यावतीने महापौर-उपमहापौरांचा सत्कार

Madanbhau's name is also in Kupwara's office | कुपवाडच्या कार्यालयालाही मदनभाऊंचे नाव

कुपवाडच्या कार्यालयालाही मदनभाऊंचे नाव

Next

कुपवाड : महापालिकेच्यावतीने माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांचे नाव प्रभाग समिती क्रमांक तीनच्या सभागृहाला दिले. प्रशासनाने आता तेच नाव महापालिकेच्या बाहेर कार्यालयाच्या प्रथमदर्शनी बाजूसही द्यावे, त्याची त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश नूतन महापौर हारूण शिकलगार यांनी प्रशासनाला दिले. महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्यावतीने आयोजित महापौर, उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमास उपमहापौर विजय घाडगे, सभापती संतोष पाटील, आयुक्त अजिज कारचे, प्रभाग तीनच्या सभापती संगीता खोत, उपायुक्त सुनील नाईक, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक गजानन मगदूम, शेडजी मोहिते प्रमुख उपस्थित होते.शिकलगार म्हणाले की, कुपवाड शहरातील महत्त्वपूर्ण असलेला ड्रेनेजचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावणार आहे. याबरोबरच शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, शहरातील रस्ते, गटारी आदी महत्त्वाचे प्रश्न सुटत आहेत. त्याप्रमाणेच यापुढील कालावधित माझ्या कारकीर्दीमध्ये अविकसित भागातील प्रश्नही प्र्राधान्याने सोडविले जातील. तसेच रस्त्याची निविदा प्रसिध्द झाली असल्याने तोही प्रश्न सुटेल.
प्रभाग समिती तीनच्या सभापती संगीता खोत म्हणाल्या की, प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून शहरातील महत्त्वाचा असलेला इमारतीचा प्रश्न सुटलेला आहे. शहरातील रस्त्यांसह इतरही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी.
नगरसेवक शेडजी मोहिते म्हणाले की, मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी मदनभाऊंनीच प्रथम या इमारतीसाठी सहकार्य केले होते. त्यावेळी निधीही धरला होता. नूतन महापौरांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी भरीव निधी द्यावा. त्यामुळे अविकसित असलेल्या कुपवाड शहराला न्याय मिळेल.
शिकलगार व घाडगे यांचा सत्कार प्रभाग समितीच्या सभापती खोत यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचाही सत्कार झाला. यावेळी सहायक आयुक्त चंद्रकांत चौधरी, मिरजेच्या प्रभाग समिती सभापती मालन हुलवान, नगरसेविका गुलजार पेंढारी, रोहिणी पाटील, मयूर पाटील, अनिल पाटील, कल्लाप्पा हळिंगळे, चवगोंडा कोथळे, अशोक कुंभार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


नामकरण : वादाचा विषय
कुपवाड येथील प्रभाग समिती क्र. ३ च्या सभागृहाला मदनभाऊंचे नाव देण्याचा निर्णय झाल्यानंतर याठिकाणी वाद निर्माण झाला होता. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी या सभागृहाला दिवंगत स्वातंत्र्यसैनिक धोंडीरामबापू माळी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला होता.

धोंडीरामबापूंच्या नावाचा पडला विसर...
नामकरणाचा वाद मिटविताना सत्ताधारी गटाने धोंडीरामबापूंचेही नाव आणखी एका सभागृहाला देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या नावाचा विसर सत्ताधाऱ्यांना पडल्याचे चित्र आहे.

Web Title: Madanbhau's name is also in Kupwara's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.