खिल्ली उडवणाऱ्या मदनराव मोहिते यांना आवर घालावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:39+5:302021-06-24T04:18:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मागणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मागणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांना सहकार पॅनलच्या डॉ. सुरेश भोसले यांनी आवर घालावा अन्यथा वाळवा तालुक्यात फिरु देणार नाही, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.
रेठरे हरणाक्ष येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत सहकार पॅनलचे मार्गदर्शक, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी एकरकमी एफआरपी मागणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. पूर्वी पहिले, दुसरे, तिसरे व अंतिम बिल मिळाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे साखर कारखान्याला व्याजाचा भुर्दंड भरावा लागतो, असेही मदनराव मोहिते म्हणाले. वास्तविक एफआरपीचे तुकडे झाल्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. पर्यायाने ऊस उत्पादकांना बिनव्याजी कर्ज मिळत नाही. याचा मोहिते यांनी अभ्यास करावा, असा सल्ला जाधव यांनी दिला आहे.
आमचे नेते राजू शेट्टी यांनी कृष्णेच्या निवडणुकीत कोणाचेही समर्थन केलेले नाही. स्थानिक कार्यकर्ते आपापल्या ताकतीवर पॅनलमध्ये सामील आहेत. त्यांना तसे सूचितही केले आहे. असे असताना मोहिते यांनी संघटनेच्या एकरकमी आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. त्यांना सुरेश भोसले यांनी समज द्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.